लेख – बालविवाहः कारणे आणि परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. सचिन बादल जाधव

विवाह कायदा कडक असूनही बालविवाह थांबत का नाहीत? हा प्रश्न रास्त आहे. मात्र त्यामागचे महत्त्वाचे कारण असे आहे की, भ्रूणहत्येचा प्रश्न जसा समाजाच्या विचारी, बोलक्या वर्गापर्यंत पोहोचला आणि मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन झाले तसे बालविवाहाच्या बाबतीतअद्याप झालेले नाही. बालविवाह ही आजची समस्या नसून तो मागच्या शतकातला विषय होता, अशीच अनेकांची समजूत असते, परंतु ग्रामीण भागातील हे वास्तव विचारी वर्गापर्यंत पोहोचले नाही.

बालविवाह हा विषय जणू मागच्या शतकात होता आणि जणू आता ती समस्या उरली नाही, अशीच अनेकांची समजूत असते. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच, पण फारशी चर्चाही होत नाही. महाराष्ट्र हे ‘पुरोगामी’ राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती, बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती आहे याची चर्चा कोणीच करत नाही, पण हिंदुस्थानात आजही 47 टक्के, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 35 टक्के इतके आहे हे लक्षात घेतल्यावर धक्काच बसतो.

लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रात ज्या काही सामाजिक गोष्टींचे नुकसान झाले त्यात बालविवाहाचे प्रचंड वाढलेले प्रमाण ही अत्यंत चिंताजनक अशी बाब. एकीकडे तमाम सरकारी यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे कमीत कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत बालविवाह पार पडत होते. लॉक डाऊनचा गैरफायदा घेत मोठय़ा प्रमाणावर मुलींचे बालविवाह झाले.

बालविवाह थांबवणे हे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, आरोग्याचे सार्वत्रिकीकरण आणि महिलांचे सक्षमीकरण या तीन कारणांसाठी जास्त महत्त्वाचे आहे. बालविवाह होणाऱ्या मुली या 12 ते 17 वयोगटातील म्हणजे 6वी ते 12वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या असतात. बालविवाह मोठय़ा संख्येने होत असताना या मुलींची शाळेतून गळती होते. त्यामुळे प्रत्येक मुला-मुलीला शिकवण्याचा आपला हेतू फसतो आहे. आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांतील मुलींच्या गळतीचे प्रमाण तर 35 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. म्हणूनच बालविवाह थांबवणे हे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. ‘सर्वांसाठी आरोग्य’ या महत्त्वाकांक्षी योजनेलाही बालविवाह सुरुंग लावतात. शरीराची पुरेशी वाढ न झालेल्या बालविवाहातील मुलींवर लगेच बाळंतपण लादले जाते. त्यात होणारा रक्तस्राव, मातामृत्यूचे वाढते प्रमाण,त्यामुळे कायमस्वरूपी ऑनिमिक होणे आणि जन्माला येणारी मुले कमी वजनाची, कुपोषित असणे, त्यातून बालमृत्यूचे प्रमाण वाढणे असे अनेकविध आरोग्यविषयक दुष्परिणाम बालविवाहाचे आहेत. यामध्ये ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही कल्पनाच हजारो, लाखो मुलींसाठी व त्यांच्या मुलांसाठी अशक्यप्राय होऊन जाते. स्त्राr सक्षमीकरण हा मुद्दादेखील बालविवाहाशी जोडलेला आहे. स्त्राrने उच्च शिक्षण घेतले, विविध प्रकारच्या समाजातील संधी, अनुभव घेतले तरच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, परंतु काही समजण्याच्या आतच या मुलींचे बालविवाह झाल्याने मुले, संसार अशी जबाबदारी पडते आणि व्यक्तिमत्त्वाचा कुठलाच विकास होत नाही. उलट सासरच्या वागणुकीमुळे या मुलींमध्ये मोठय़ा प्रमाणावर न्यूनगंड विकसित होतो आणि मुली भीतीच्या सावटाखाली उरलेले आयुष्य काढतात. बालविवाह झालेल्या मुलींना सोडून देण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यातून आयुष्याची खूपच फरफट होते. मुलींचे बालविवाह करायचे आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायात विकायचे, असेही मोठे रॅकेट पश्चिम बंगालमध्ये सापडले आहे.

बालविवाह थांबवायचे असतील तर सर्वप्रथम त्यातील लपवालपवी थांबवायला हवी. गावकऱ्यांच्या भीतीने स्थानिक शाळा मुलीचा बालविवाह झाला तरी ते ती माहितीच प्रशासनाला देत नाहीत. सतत गैरहजर म्हणून नाव कमी करतात किंवा ते नाव तसेच पुढच्या इयत्तेत कायम ठेवतात. आरोग्य विभागही बाळंतपणासाठी नोंदणी करताना हमखास वय अठरा लिहितात. त्यातून कमी वयाच्या मुली लक्षात येत नाहीत. सामाजिक पातळीवरही असेच घडते. त्यामुळे बालविवाहाच्या कायद्यामध्ये अगदी लग्न ठरवणारे मध्यस्थ, लग्नाला उपस्थित राहणारे लोक, भटजी, मंगल कार्यालय,फोटोग्राफर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असतानाही संपूर्ण देशात शंभर गुन्हेदेखील दरवर्षी दाखल होत नाहीत. शिक्षा होण्याचे प्रमाण तर अत्यल्प आहे. त्यामुळे या कायद्याचा धाकच तयार होत नाही.

सरकारने ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे आणि त्यांच्या जोडीला अंगणवाडी सेविका दिल्या आहेत. ग्रामसेवकांचे पूर्वीसारखे प्रभावी स्थान आता गावात राहिलेले नाही. ग्रामसेवकांना गावातील म्होरक्यांच्या प्रभावाखालीच काम करावे लागते.अनेक ग्रामसेवक गावात राहत नाहीत. त्यामुळे त्या गावावर त्यांचा प्रभावही मर्यादित आहे. अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची त्या गावाच्या रचनेत कोणाला धाक दाखवतील अशी स्थिती नाही. कोणाचेही लग्न थांबवू शकतील अशी ताकद प्रशासनाने त्यांना दिलेली नाही. तेव्हा या यंत्रणांवर अशी जबाबदारी टाकण्यापेक्षा गावातील सरपंच व पोलीस पाटील यांनाच त्याबाबत जबाबदार धरायला हवे. ज्या ग्रामपंचायत सदस्याच्या वॉर्डात असे बालविवाह होतील त्याचे सदस्यत्व रद्द होईल इतकी धाडसी तरतूद जर केली तरच बालविवाह थांबतील. कारण त्या परिसरातील राजकीय नेत्याची मूक संमती असल्याशिवाय कोणताही पालक असे धाडस करत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शासकीय योजना गावाला देताना गावाने बालविवाह थांबवण्याबाबत केलेले प्रयत्न आणि त्यासंबंधीचे प्रबोधन याचाही विचार करायला हवा.

महत्त्वाचे म्हणजे लग्नाला परवानगी देणारा कायदा आणायला हवा. कोणतीही कृती करताना, एखादा छोटा व्यवसाय टाकताना जर ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असेल तर लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट ही शासकीय परवानगीशिवाय होऊच कशी शकते? म्हणून वयाचे दाखले ग्रामपंचायतीकडे देऊन लग्नाची परवानगी देण्याचा कायदा करायला हवा. त्यातून वयाची पडताळणी होईल. घटस्पह्ट न देता महिलांना सोडून दिल्यावर लग्न झाले होते हे सिद्ध करणे खूप कठीण असते.अशा प्रकारचे परवानगीचे प्रमाणपत्र हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल व बालविवाह रोखले जातील. महाराष्ट्रात विवाह नोंदणी करण्याचे प्रमाण फक्त 8 टक्के आहे. ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी सक्तीचे करायला हवे. उदाहरणार्थ लग्नानंतर माहेरून सासरी आलेल्या सुनेचे लगेच नाव रेशनकार्डमध्ये नोंदवण्याची घाई असते. अशा वेळी जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सक्तीचे केले तर लोक विवाह नोंदणी करून घेतील. त्यामुळे बालविवाह करण्याचे धाडस करणार नाहीत. अशा काही कायदेशीर सुधारणाही करायला हव्यात.

बालविवाह हा विषय फक्त महिला व बाल कल्याण विभागाचा नाही. हा विषय खरे तर शिक्षण विभागाकडे सोपवायला हवा. शिक्षण विभागाने शिक्षकांना या विषयावर सजग करणे, कायदा समजावून सांगणे, बालविवाहाचे तोटे याबाबत त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली तर महाराष्ट्राच्या वाडी-वस्तीपर्यंत पोहोचलेला शिक्षक समुदाय बालविवाह थांबवण्याबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनाही प्रबोधनाची जबाबदारी देऊन त्यांना प्रशिक्षित करायला हवे. कारण हाच घटक गावपातळीवर खूप महत्त्वाचा आहे. बचत गटाच्या महिलांना याबाबत सजग केले तर मदत होईल. भ्रूणहत्येच्या बाबतीत अगदी गणपतीच्या मांडवातही त्याचे देखावे झाले,रांगोळी चित्रकला,निबंध स्पर्धा झाल्या, इतक्या व्यापक पातळीवर जर बालविवाहाबाबत प्रबोधन होऊ शकले तरच बालविवाह थांबतील.