संजय घाडीगावकर शिवबंधनात; शिवसेना भवन येथील प्रवेश सोहळय़ात उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी घाडीगावकर यांच्यासह  शेकडो कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेतला.

2012 मध्ये घाडीगावकर ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 2019 साली त्यांनी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना 29 हजार 775 मते मिळाली होती. शिवसेना पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाण्यात अधिक मजबूत करण्याकरिता झटणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, उपनेत्या अनिता बिर्जे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील माजी नगरसेवक शैलेश सावंत, मधुकर होडावडेकर, संजय दळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसैनिकांची विनंती स्वीकारली

पक्षप्रवेशाच्या सोहळय़ात संजय घाडीगावकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ठाण्यात जाहीर सभा घेण्याची विनंती केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुम्ही सभेची तयारी करा, आपण लवकरच ठाण्यात जाहीर सभा घेऊ, असे सांगितले.