
डॉ. संजय बोरुडे
दिवाळी म्हणजे सणांचा राजा. वसुबारसपासून सुरू होणारा हा सण प्रकाशाचा उत्सव म्हणूनच आपण साजरा करतो. यानिमित्ताने अनेक परंपरा, चालीरिती याचे आचरण आपण करतो.
दिवाळीचा सण फक्त कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. दिवाळी पौर्णिमा व्रत, सत्यव्रत, मणिकर्णिका स्नान, कार्तिक पौर्णिमा, कार्तिक स्नानाची समाप्ती. कार्तिक स्नान करताना या संपूर्ण महिन्यादरम्यान दररोज उठून पहाटे पवित्र नदीत किंवा घरी पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. महिला आणि अविवाहित मुली घरात कार्तिक स्नान करतात. कारण ते खूप शुभ मानले जाते. कार्तिक महिन्यात पहाटे स्नान केल्याने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यासारखेच पुण्य मिळते, असा समज आहे. म्हणून या महिन्याला मोक्षाचे द्वार असेही म्हणतात. कार्तिक महिन्यात एक महिना अखंड दिवादान करणे पवित्र मानले जाते. तसेच देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजे काकड आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तीला काकडय़ाने ओवाळले जाते. म्हणून त्याला काकड आरती असे म्हणतात. कार्तिक महिन्यात मंदिरांमध्ये रोज पहाटे काकड आरती केली जाते.
यानंतर सणांचा राजा असलेला दिवाळी हा सण किमान चार दिवस चालतो. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक गाईस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गाईची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.
पहाटे मंदिरात बवळणगाईचे गाणेही म्हटले जाते –
आमची बवळण गाय बरी हो
दूध भरून देते चरी (चरवी )
चरी चरी की नाना परी हो
तिला राखितो गोयंदा हरी …
यानंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी, ज्याला धन तेरसदेखील म्हटले जाते. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणूनदेखील साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशेबाच्या नव्या वहय़ांची पूजा करून त्यांचा वापर करण्यास सुरुवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजादेखील बऱयाच ठिकाणी केली जाते.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी, निýती या नावांनीही ओळखतात. निýती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची (रक्षणकर्त्यांची )लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत. मात्र अलीकडे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात.
यानंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखतात. या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात. साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला ‘शुभा’ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गोक्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात. या दिवशी सागर जिह्यातील रमछिरिया येथे देवगोवर्धन मेळा आणि इंदूर
जिह्यातील गौतमपुरा गावात हिंगोट युद्ध असते. द्वितीयेच्या दिवशी भाऊबीज आणि यमद्वितीया असते. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. ‘‘इडापीडा टळो, बळीचे राज्य येवो’’ असे आपण म्हणतो. म्हणजे आपल्या कृषी परंपरेत बळीराजा अवशेषरूपाने म्हणीत अथवा उपरोक्त सणाच्या रूपात उरला आहे. व्यवस्थेला त्याचे अस्तित्व पुसता आलेले नाही. दसऱयाला बळीला नाहीसे करून (दक्षिणपथे अर्थात पाताळात पाठवून) दिवाळीच्या दिवशी तो येणार, अशी वदंता पसरल्याने आपल्या लाडक्या राजाच्या स्वागतासाठी हा सण साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजे तसा हा कृषी परंपरेतील दुःखाचा सण आहे, असेही वाटू शकते. आर्य-अनार्य तसेच शैव-वैष्णव विसंवादातून हा विरोधाभास दिसून येतो.
कार्तिक पौर्णिमेला मात्र विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी भोलेनाथांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. या आनंदात देवतांनी दिवा लावून हा सण साजरा केला, असे मानले जाते. म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात अठरा धाग्यांत 750 त्रिपुरवाती लावल्या जातात. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिव, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया आणि क्षमा या सहा तपस्वींची पूजा केली जाते. कारण त्या शिवपुत्र कार्तिकेयाची माता आहेत आणि त्यांच्या उपासनेने पुण्य प्राप्त होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस तुळशी विवाह तिथी असतात. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. अर्थात वृंदेचे आख्यान समजून घेतल्यावर असे विवाह लावणे अप्रस्तुत आहे असे वाटल्याखेरीज राहत नाही.
शैव परंपरेनुसार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गमंडप (छतविहीन वर्तुळाकार गोल) असलेल्या शिवमंदिरात ‘त्रिपुरासिद्धी’ची साधना केले जाते. स्वर्गमंडप म्हणजे छताच्या ऐवजी वर्तुळाकार, उघडा गोल असतो. त्यातून एरवी आकाश दिसते, पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री चंद्रबिंब जेव्हा माथ्यावर येते तेव्हा खालच्या गोलाकार रंगशिळेवर वर्तुळाकार प्रकाशबिंब उमटते. तेव्हा या चंद्रप्रकाशात शैव साधक त्रिपुरा साधना करतात. अशा मंदिरांपैकी खिद्रापूर ( जि. कोल्हापूर ), लासूर (जि.अकोला), संगमेश्वर (जि. जळगाव) ही काही उदाहरणे आहेत. अशा शिल्पजडित मंदिरात एरवी यक्षिणी साधनाही केली जाते.
पुढे येते कार्तिकी एकादशी अर्थात धाकटी एकादशी. आषाढी व कार्तिकीला पंढरपूरला मोठी वारी असते. लोकगीतातही ही वारी अमर झाली आहे –
आषाढीपासून कार्तिकी दाटली
पांडुरंगाच्या रथात रखुमाई भेटली
कार्तिकी एकादशी विठ्ठला तुला मला
तांब्याच्या भरण्यानं पाणी घालावं तुळशीला
अशा प्रकारे आश्विन व कार्तिक मास सण, उत्सवांसकट आपल्या भावविश्वाला कवटाळून बसले आहेत.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)































































