कवडसे – जाणता अजाणता…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

आपले मन छान, आनंदी असताना त्याला कधी तरी उगाच लहर येते, सुंदर क्षण जगता जगता अचानक त्या मनात कटुता निर्माण होते आणि ती दोन मने भांडू लागतात. त्याचा परिणाम त्या दोघांत अबोला निर्माण करून जातो. एका मनाला वाटते की काही दिवस शांत निवांत राहूया. कुणाशी बोलणे नको आणि त्यातून होणारे वादसुद्धा नको. म्हणून ते शांत असते. मग दोन मनांच्या गप्पा, बडबड सगळे काही बंद होते. काल-परवापर्यंत छोटय़ा छोटय़ा गोष्टी एकमेकांना सांगून जगणारी ती वेडी मने अचानकपणे बोलायचे बंद झाल्यामुळे त्यांना सगळे सुने सुने वाटू लागते. काळ पुढे सरकत जातो आणि दोन मनांमधला अबोला तसाच राहतो. खरे तर मनाचा अबोला हा अबोला असला तरी तो काहीतरी बोलत असतो. बुद्धीने अबोला धरल्यावरच तो खऱया अर्थाने दूर करतो. मनाने मनाशी भांडण केले की बुद्धीचा अंमल सुरू होतो आणि ज्या मनांना एकमेकांशी बोलल्याशिवाय करमत नाही. त्याच मनाला बोलायचा पंटाळा येतो.

संध्याकाळ सुनी होते आणि पहाट उदासीन. दोघांचा वेगळा प्रवास सुरू होतो आणि वाटासुद्धा वेगळ्या होतात. मग आंतरिक घुसमट जन्माला येते. खूप प्रश्न मनाला पडतात तरी ते सोडवण्याचा प्रयत्न केला जात नाही. आपण चालत राहतो आणि बोलूया कधीतरी असा विचार करतो, पण त्या मनाला हे ठाऊक नसते की कधी कधी दोन मनामनांतला अबोला कायमचा दूर नेऊन ठेवतो. कारण एक मोठे अंतर पार करून गेल्यावर मागे वळून पाहताना ज्या वळणावरून आपण कधी प्रवास सुरू केला ते वळण दिसतच नाही. असे जुळत गेलेले बंध मग तसे पुन्हा जुळत नाहीत. कारण यामधल्या काळात मनाचे प्रहर बदलत जातात. वेगळ्या विचारांचा अंमल सुरू होतो मनावर. त्यात बुद्धीसुद्धा खतपाणी घालून मनाला कोरडे करते. आपलेच मन विचार करू लागते. कुठे गेल्या त्या भावना, कुठे गेली ती ओढ. जी कायम एका धाग्यात बांधून ठेवायची आपल्याला, हा विचार करता करता हळूहळू मनाचे एकेक बंध सैल होत जातात. दुरावा वाढत जातो. कारण मन खूप हट्टी असते.

ज्या मनाने खूप काही सहन करून एखादे नाते जपले तेच नाते जर त्या मनाचा विचार करत नसेल, फक्त स्वतःच्या मनाच्या काळजीसाठी दुसऱया मनाला त्रास देत असेल, तर ते मनसुद्धा हळूहळू कठोर होऊ लागते. अंतर जास्त वाढत जाते. अशा मनाने काय करावे किती दिवस वाट पाहावी की वाट पाहता पाहता स्वतःचं अस्तित्व काय आहे. हा विचार करत आपणही आता तसेच वागावे असे ठरवून आपल्या वाटेवर चालू लागावे. मग एखादी संध्याकाळ अशी येते, की तिच्या सुरंगी रंगात आपल्या मनाचे रंग बदलून जातात.

नंतर येते एक काळरात्र, जी कधीच न संपणारी असते आणि ती कायमची दोन मनांना दूर करून जाते. आपापल्या वाटेवर आपण तेच सुखाचे चार क्षण शोधत घुमसत राहतो आतल्या आत, पण त्याचा कधी उपयोग होत नाही. जरी ते मन पुन्हा जवळ आले बोलायला तरी ते बंध, तीच जुनी ओढ जुळणे कठीण असते. ज्या काळात खऱया अर्थाने ज्याची साथ हवी, तोच त्या वेळी नसेल तर असल्या स्वार्थी मनाला खरेच उभे का करायचे, की पुन्हा अशी बंडखोरी एका मनातल्या विचारांनी दुसऱया मनासाठी केलेली असते. तेच मन आणि त्याचे विचार जर ठाम राहिले तर त्या दोन मनांच्या गोड मैत्रीचा तिथेच दुर्दैवी अंत होतो. एक गोड नाते कायमचे संपते. मनाने मनासारखे वागणे ठीक आहे, पण त्याच वेळी मनाने मनालाच जपावे, आपले मन जपणे म्हणजे सर्वकाही नसते. समोरचे मनही आपल्याच मनाशी समरस असते. म्हणून जेव्हा दोन मनांत अबोला होतो तेव्हा दोघांनाही त्रास होतो. हट्ट असतो एका मनाचा, पण त्रास होतो दोन मनांना जाणता अजाणता.

– [email protected]