
एका तृतीय पंथीयास लग्नाचे आमिष दाखवून, इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करणे तसेच साडेतीन लाख रुपये घेऊन, फसवणूक व मारहाण केल्याप्रकरणी ऋषिकेश बबन परमाज (रा.हेरले,ता.हातकणंगले) याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित ३४ वर्षीय पीडित तृतीयपंथीय घरकाम, देवदासी व्यवसाय करत असून, आई-वडील व लहान भावासह कबनूर (ता.हातकणंगले) येथील रहिवासी आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मे 2018 मध्ये इचलकरंजी येथे पीडिताची ऋषिकेशशी ओळख झाली. ओळखीतून जवळीक आणि प्रेम संबंध निर्माण झाले.
लग्नाचे आमिष दाखवून ऋषिकेशने पीडिताच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. यानंतर दि. 9 जुलै 2022 रोजी अथणी, जि.बेळगाव येथील एका मंदिरात रीतीरिवाजानुसार दोघांनी लग्न केले. त्यानंतर वकिलांकडे जाऊन कायदेशीर लग्न केल्याबाबत कागदपत्रे तयार केली. घरामध्ये लग्नाचे फोटोही काढले.दोघांचाही एकत्र संसार सुरू होता. यावेळी आपला विश्वास संपादन करून कामधंद्यासाठी ऋषिकेशने वेळोवेळी पीडिताकडून रोख साडेतीन लाख रुपये घेतले. यानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी मिरज येथे औषधोपचार करून घरी परत येताना, जयसिंगपूर येथील एका लॉजच्या मागे मोकळ्या जागेत ऋषिकेशने पीडिताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच येथेही अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार होते. पीडिताला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, याबाबत कोणास न सांगण्याची धमकी देत त्यांनी घरी सोडले. अखेर घरातील नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर संबंधित पीडित तृतीय पंथीयाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ऋषिकेशविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 377, 420, 323, 504, 506, 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार अर्जात जयसिंगपूर पोलिस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी संबंधित तृतीयपंथीयाकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांना तक्रार अर्ज दिला आहे. यामध्ये ऋषिकेश आणि त्याच्या साथीदाराकडून अनैसर्गिक अत्याचार, जीवे मारण्याच्या प्रयत्नासह अमानुष मारहाण केल्याचे म्हटले आहे. शिवाय रोख रक्कम आणि दागिने असे पाच लाखाहून अधिक ऐवज काढून घेतल्याचाही उल्लेख आहे. तर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला अपशब्दांसह अवमानास्पद वागणूक मिळाली असून, पोलिसांनी आपली वैद्यकीय तपासणी केली नसल्याचा आरोपही या अर्जात करण्यात आला आहे.

























































