भूमिकांचा अभ्यास महत्त्वाचा – रोशन विचारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

झी मराठीवर सुरू असलेली ‘दार उघड बये’ ही मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सारंग नगरकर ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार म्हणजे रोशन विचारे… एक प्रॉमिसिंग चेहरा.

रोशनचं बालपण संस्कारक्षम वातावरणात गेलं. त्याची आई शिक्षिका आणि वडील खासगी क्षेत्रात नोकरी करत होते. शाळेत असताना रोशनने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने मार्केटिंगमध्ये एमबीए केलं आहे. तो मल्टिनॅशनल कंपनीत काही वर्षे नोकरीदेखील करत होता, पण तेव्हासुद्धा तो अभिनयात कार्यरत होताच. कॉलेजमध्ये असल्यापासून तो एकांकिका करत होता. राज्य नाटय़ स्पर्धेतसुद्धा त्याला पारितोषिके मिळाली होती.

‘वंदे मातरम’ या नाटकात रोशनने भगतसिंग यांची भूमिका केली. काही हिंदी मालिकांत त्याने काम केले होते. झी युवाने ‘अँकर हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते आणि त्यात रोशन जिंकल्यामुळे त्याला झी युवावरील ‘युवागिरी’ कार्यक्रमाचे अँकरिंग करण्याची संधी मिळाली. ‘आरती -दि अननोन लव्ह स्टोरी’ या मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली होती. त्यावेळी त्याची नोकरी सुरू होती. त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत ऑफिस आणि मग रात्री शूटिंग असंसुद्धा त्याने केलं होतं. ‘कलर्स मराठी’वर ‘महाराष्ट्र जागते रहो’ नंतर त्याला लगेच ‘श्री लक्ष्मीनारायण’ मालिकेत भगवान विष्णूंची भूमिका करण्याची संधी मिळाली. रोशन सांगतो, देवांच्या भूमिका करताना खूप मोठी जबाबदारी असते. संवादावर भर देताना भाषेवर प्रभुत्व असणे, आवाजातील आरोह अवरोह यांचा अभ्यास, देहबोली या सर्व गोष्टींना महत्त्व असतं. आणखी एक संधी मला मिळाली आणि ती म्हणजे सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’मध्ये शहाजीराजे साकारण्याची! या मालिकेसाठी मी शिवकालीन युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण आलं ‘दार उघड बये’ या मालिकेमुळे रोशन म्हणतो, यात मी सारंग नगरकर ही व्यक्तिरेखा करतोय. परदेशातून शिकून आलेला, आपल्या मतांवर ठाम असणारा, हिंदुस्थानी संस्कृतीचा आदर असणारा, आपली मते नम्रपणे आणि आत्मविश्वासाने दुसऱयांना पटवून देणारा असे अनेक कंगोरे ‘सारंग’ या भूमिकेला आहेत. या मालिकेतील माझा ‘अनबिलिव्हेबल’ हा शब्द आणि माझी स्माईल या गोष्टी खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

रोशनने एका इंग्रजी चित्रपटातदेखील काम केले आहे. इंटरनॅशनल फिल्ममध्ये काम करतानाचा अनुभव हासुद्धा खूप काही शिकवणारा ठरतो, असेही तो सांगतो. भूमिकांचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे असे ठामपणे सांगणाऱया रोशनला त्याच्या भूमिकेने खूप फॅन्स लाभले आहेत.