
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अखेर तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला. आज दुपारी बँकेने कारखान्यावर 35 सुरक्षारक्षक तैनात केले. कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने द्विपक्षीय करारानुसार कारवाई केल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी नंदकुमार पाटील यांनी सांगितले.
डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास नगर जिल्हा बँकेचा वित्तपुरवठा आहे. 2013 साली कारखान्यावर 60 कोटी कर्जाची थकबाकी होती. बँकेने कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त केली होती. 2016 साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. 2017 साली 90 कोटी कर्जाचे पुनर्गठन होऊन अकरा वर्षांसाठी मुद्दल व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले होते.
बँक व कारखाना व्यवस्थापन द्विपक्षीय करार होऊन बँकेने जप्त केलेली मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना 2017-18 पासून सुरू झाला. 2019-20 मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. मागील वर्षी 4 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. ही सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना 90 कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑक्टोबर 2022 अखेर 21 कोटींच्या व्याजासह 111 कोटी कर्जाची थकबाकी झाली आहे. बँकेने कर्जफेडीसाठी 500 ऐवजी 100 रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे, असा कारखाना व्यवस्थापनाचा आग्रह होता. मात्र, त्यास बँकेने नकारघंटा वाजविली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दाखविली.
संचालक मंडळाने बँकेला मालमत्ता ताब्यात देण्याच्या सुपूर्दनाम्याची गरज नाही. गाळप हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने द्विपक्षीय कराराचा भंग झाला आहे. करारातील अटी, शर्तीनुसार बँकेतर्फे कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केली आहे.
– नंदकुमार पाटील, सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी, नगर जिल्हा बँक


























































