कार्तिकीवारीच्या सोहळ्याला 6 लाख भाविकांची उपस्थिती, हरिनामाच्या जय घोषणाने पंढरी दुमदुमली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी तब्बल सहा लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या तिरावर वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेला कार्तिकी सोहळा यंदा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे या सोहळय़ाला दशमीच्या दिवशीच पंढरीत 4 लाख भाविक दाखल झाले होते. शेकडो दिंडय़ा पंढरीत दाखल झाल्या आहेत. चंद्रभागातीरी वारकऱयांची मांदियाळी जमली असून, भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली आहे. एकूणच पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे.

भाविक स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गर्दी करीत आहेत. मुख दर्शन, कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराकडे येत आहेत. तर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागत आहे. दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत गेली आहे. तर 65 एकर जागेवर 2 लाखांहून अधिक भाविक तंबू, राहुटय़ा उभारून वास्तव्य करीत आहेत. मठ, मंदिर, धर्मशाळा, शिक्षण संस्था आदी ठिकाणी भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी

श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असलेले भाविक दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे. येथील दहा दर्शन शेडपैकी 7 दर्शन शेडमध्ये भाविकांची रांग पोहोचली आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांग असल्याने भाविक रांगेत उभे राहत आहेत. दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी लागत आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. या राज्यातील कष्टकरी, शेतकरी यांना सुखी ठेवण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे. यावेळी मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, आमदार समाधान आवताडे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.