तक्रारदाराचे समाधान करणे हीच आपली जबाबदारी – पोलीस महासंचालक रजनीश सेठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान करणे आपली जबाबदारी आहे. त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेत कारवाईची दिशा ठरविणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित ठाणे प्रमुखांसह अमलदारांनी चांगली वागणूक दिली पाहिजे, असे मत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी व्यक्त केले आहे.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील कामांचे नुतनीकरण आणि प्रियदर्शनी शाळेच्या पुर्वप्राथमिक इमारतीच्या नुतनीकरण समारंभ गुरूवारी पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, उपायुक्त विवेक पाटील उपस्थित होते.

रजनीश सेठ म्हणाले, प्रत्येक तक्रारदाराचे समाधान होणे आवश्यक असून वरिष्ठ अधिकाऱ्यासह पोलीस अंमलदारांनी त्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. त्याशिवाय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागामध्ये नवनवीन सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे.

शारिरीक स्वास्थ टिकविण्यासाठी पोलीस दलातील प्रत्येकाने वेळोवेळी शारिरीक तपासण्या करून घ्याव्यात. प्रामुख्याने पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्यांसाठी हेल्थ कॅम्प राबवून तपासणीच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासह इतर महत्वाचे बंदोबस्त उत्तमरित्या पार पाडले. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सुरळित राखल्याबद्दल महासंचालकांनी अभिनंदन केले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्यालयातील इमारतींच्या नुतनीकरणामध्ये मोलाचा वाटा सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर, किशोरकुमार टेंभुर्णे, उपनिरीक्षक दत्तात्रय धावडे, संतोष जाधव, अनिल उपरे, अभिजीत ढमढेरे यांच्यासह मनिष राऊत, अर्पिता दिक्षीत, प्रिन्सीपल, प्रियदर्शनी शाळेचे डॉ. राजेंद्र इंद्रकन सिंह यांचा पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंह, अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांनी केले. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आभार मानले.