मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे, हे जनतेलाही ठाऊक आहे; आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, सॅफ्रन, टाटा एअरबस असे काही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यातील गुंतवणुकीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले होते. त्यासाठी आदित्य ठाकरेंनी ‘ट्विटर पोल’ घेतला होता. त्याचे निकाल आल्यावर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

राज्यातील शिंदे सरकारला ‘खोटे सरकार’ म्हणत आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर पोल घेतला आहे. ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्री ‘वेदान्त फॅाक्सकॅान’ आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारतील? तुम्हाला काय वाटतं?’ असे महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी विचारले आहे. यावर 74 टक्के लोकांनी ‘नाही’ तर, 26 लोकांनी ‘होय’ म्हणून मत व्यक्त केले आहे.

या पोलचे निकाल आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. जनतेलाही या खोके सरकारवर आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे आहेत हे जनतेलाही ठाऊक आहे. पोलमधे हे स्पष्ट दिसतंय, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यातील प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर कधी गेले, याची तपशीलवार माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली होती. तसेच तारखा आणि बातम्यांचे सदर्भ देत त्यांनी विद्यमान सरकारच्या अनास्थेमुळेच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचे दाखवून दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर यावे. तसेच समोरसमोर चर्चा करावी, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले होते.