
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाची धगधगती मशाल. मराठी मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवला आणि अन्यायावर प्रहार करण्यासाठी मनगटात बळ दिले ते बाळासाहेबांनीच. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट एका भव्यदिव्य स्मारकाच्या रूपाने जनतेसमोर येणार असून या राष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2023 मध्ये हे स्मारक जनतेसाठी खुले होईल. शिवसेनाप्रमुखांचे हे केवळ स्मारक नसेल, तर मराठी माणसाला मंदिरातील गाभाऱयासारखे सकारात्मक ऊर्जा देणारे स्फूर्तीमंदिर असेल, असा दृढ विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक नेमके कधी पूर्ण होणार याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. त्यामुळे स्मारकाबाबतची माहिती जनतेला मिळावी म्हणून आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) सॉफिटेल हॉटेलमध्ये स्मारक समितीचे मार्गदर्शक उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि सचिव सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत स्मारकाचे सादरीकरण करण्यात आले. स्मारकाच्या वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी व्हिडीओ सादरीकरण करताना स्मारकाबाबत माहिती दिली.
सादरीकरणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेबांच्या स्मारकात त्यांच्याशी निगडित प्रत्येक आठवणींचा ठेवा असावा असा प्रयत्न आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे बाळासाहेबांची छायाचित्रे, लेख व अन्य साहित्य असेल तर त्यांनी ते स्मारकासाठी द्यावे. बाळासाहेबांनी केलेले प्रत्येक भाषण हे जनतेमध्ये, देशामध्ये जागृती करणारे होते. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेवेळी त्यांनी केलेले भाषण उपलब्ध आहे, परंतु त्यानंतरची त्यांची काही भाषणे अजूनही उपलब्ध झालेली नाहीत. कारण त्यावेळी आतासारखी रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती. ती भाषणे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
‘बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकात अनेक व्यंगचित्रे काढली. पूर्वी व्यंगचित्रे काढली की छापण्यासाठी त्यांचा ब्लॉक बनवल्यानंतर त्या व्यंगचित्रांचे काम संपायचे. तरीही त्यावेळी बाळासाहेबांनी काढलेली बरीचशी मूळ व्यंगचित्रे उपलब्ध आहेत. ही व्यंगचित्रे, भाषणे, व्हिडीओ, आठवणी या स्मारकात एकत्र करून सर्वांना एक जिवंत अनुभव देण्याचा प्रयत्न आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुतळा नसेल, पण प्रेरणा असेल
स्मारकात बाळासाहेबांचा पुतळा असेल का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर स्मारकात पुतळा नसेल, असे ते म्हणाले. ‘पुतळा म्हणजे स्मारक नव्हे. बाळासाहेबांनी नेहमी अन्यायाविरुद्ध लढा दिला. मराठी माणसाला ऊर्जा दिली. बाळासाहेबांचे स्मारक हे पह्टो, व्हिडीओ भाषणे, वस्तूंचे संग्रहालय नाही तर स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान असेल. त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा ते देत राहील. बाळासाहेबांनी जे काम आयुष्यभर केले तेच काम हे प्रेरणास्थान करेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वेळ का लागतोय?
बाळासाहेबांच्या स्मारकाला वेळ का लागतोय असा निर्माण झालेला संभ्रमही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दूर केला. ते म्हणाले की, ‘बाळासाहेबांचे स्मारक हे शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्याच्या जागेवर होत आहे. तो बंगला हेरिटेज वास्तू आहे. त्यामुळे त्या वास्तूसमोर कोणतेही बांधकाम येऊ नये, त्या वास्तूला धक्का पोहोचू नये असा नियम असतो. त्यामुळे स्मारक जमिनीखाली बांधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लागूनच समुद्र असल्याने समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड दाबाचा स्मारकाला धोका नको म्हणून संरक्षक भिंत बांधली गेली आहे. येण्या-जाण्याचा मार्ग हा सहज असावा याची काळजी घेतली गेली आहे.’
आज फक्त जागेची व्यवस्था दाखवली, उद्या रिकाम्या भिंती बोलू लागतील
स्मारकातील विविध कक्षांच्या व्यवस्थेबाबत यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले. त्यावर ‘आज फक्त जागेची व्यवस्था दाखवली असून उद्या रिकाम्या भिंती बोलू लागतील,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘स्मारकात ऑडिओ व्हिज्युअल्स, होलोग्राम्स, शिल्पकलाही असेल. बाळासाहेबांच्या भाषणातील प्रमुख वाक्ये हायलाइट केली जातील. स्मारकाच्या मूळ गाभ्याला धक्का लागेल इतका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार नाही. जगातल्या स्मारकांचा त्यादृष्टीने अभ्यास केला जात आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
माझी ऊर्जा कधीच कमी होत नाही
स्मारकाचे काम पाहण्यासाठी आपण जेव्हा जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला ऊर्जा मिळाली का, अशा प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माझी ऊर्जा कधीच कमी होत नाही. कारण बाळासाहेब माझ्या आतमध्ये आहेत. ते सतत ऊर्जा देत असतात. त्यामुळे मला बाहेरची ऊर्जा नको.’
जनतेच्या मनातील बाळासाहेब स्मारकात हवेत
शिवसेनेने केलेली आंदोलने, बंद यांचा इतिहास या स्मारकात असेल का, अशा प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी ‘मला जनतेच्या मनातील बाळासाहेब स्मारकात हवे आहेत. त्यासंदर्भातील सूचनांचे स्वागत होईल,’ असे सांगितले. बाबरी मशिदीच्या खटल्यासाठी बाळासाहेब लखनौला गेले होते. त्यावेळचे पह्टो कुणाकडे उपलब्ध असतील तर ते स्मारकासाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरे यांच्या हातून यावेळी सुटले नाहीत. राज्य सरकारने स्मारकासाठी किती मदत केली या प्रश्नावर सुभाष देसाई यांच्याकडे माईक देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘एकदा माझे बोलून झाले की मी या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सुभाष देसाई यांच्याकडे माईक देतो. कारण एकदा माईक त्यांच्याकडे दिला की मग मला पुन्हा खेचून घ्यावा लागणार नाही,’ असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. फडणवीस यांनी एका कार्यक्रमात शिंदे यांच्याकडून माईक खेचून घेतला होता.
स्मारकात प्रवेश करताच प्रसन्नता जाणवेल – वास्तुविशारद आभा लांबा
स्मारकाच्या वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्यांची आठवण होईल अशा स्वरूपात स्मारकाची रचना करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. स्मारकात प्रवेश केल्यानंतर पाण्याचे एक कुंड बनवण्यात आले आहे. स्मारकात उंच इमारती नाहीत. मात्र आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक प्रसन्न आणि पवित्र भावना जाणवेल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या स्मारकाच्या उभारणीसाठी एकही झाड तोडले गेलेले नाही. स्मारकाच्या वास्तूची रचना करताना लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आवडीनिवडीही ध्यानात घेतल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.
स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद – सुभाष देसाई
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक 2023 च्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि जनतेसाठी खुले होईल, असे यावेळी शिवसेना नेते व स्मारकाचे सचिव सुभाष देसाई यांनी सांगितले. स्मारकासाठी राज्य शासनाने 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून आतापर्यंत झालेल्या बांधकामात 181 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. स्मारकाचे काम एमएमआरडीएच्या अखत्यारित सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स या पंपनीकडून होत असून 58 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
स्मारकासाठी सीआरझेड, पर्यावरण तसेच हेरिटेजकडून परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पुढच्या टप्प्यासाठी ईडीसी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीला नियुक्त करण्यात आले आहे. स्मारकात सादर करण्यात येणाऱया प्रसंगांची निवड व गुंफण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव, ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे संपादक सचिन परब आणि मुंबई विद्यापीठातील संशोधक डॉ. संजय पाटील यांचा अभ्यासगट नेमण्यात आला आहे, असे देसाई यांनी सांगितले.
तोतया सोडून शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री स्मारकात असतील, कदाचित पहिला पंतप्रधानही
शिवसेनेचा पहिला नगरसेवक, पहिला आमदार, पहिला महापौर यांचे पह्टो आणि तो इतिहास या स्मारकात असेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यावर शिवसेनेचे मुख्यमंत्रीही असतील का, असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘शिवसेनेचे नाव घेऊन तोतयेगिरी करणारे सोडून इतर सर्व शिवसेनेचेच मुख्यमंत्री स्मारकात दिसतील. कदाचित तोपर्यंत पहिला पंतप्रधानही असेल,’ असे ते म्हणाले.
असे असेल स्मारक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा असलेल्या ऐतिहासिक महापौर बंगल्याच्या जागी त्यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे.
बाळासाहेबांची प्रतिभा, प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक असेल
स्मारकाच्या प्रसन्न वास्तूमध्ये चौसोपी जलाशय.
स्मारकात येणाऱयांना बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर समोरासमोर उभे राहून संवाद साधता येईल अशी अद्ययावत व्यवस्था.
बाळासाहेबांवर दृकश्राव्य चित्रपटांचे सादरीकरण
स्मारकाच्या मागच्या बाजूला असलेल्या अथांग सागराची गाज संग्रहालयाची भव्यता विषद करेल.
उदयोन्मुख कलाकारांसाठी विशेष कलादालन.
बाळासाहेबांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीची सचित्र माहिती देणारे विशेष दालन.
शिवसेनेचा इतिहास सांगणारे दालन.






























































