
जुन्या वादातून हल्लेखोराने तरूणाला दांडक्याने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय हातात कोयता घेउन मी इथला भाई आहे असे म्हणत परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना 6 नोव्हेंबरला रात्री सात ते आठच्या सुमारास सोमवार पेठेत घडली. सागर भुजंग नायडू (वय 27 रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाहरूख हंजगीकर (वय 30) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शाहरूख आणि त्यांचा मित्र विकास शिंदे हे 6 नोव्हेंबरला गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी कोयता घेउन आलेल्या सागरने जुन्या भांडणाच्या रागातून शाहरूखला दमबाजी केली. कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, आमच्या मध्ये कोणी आले तर जिंवत ठेवणार नाही, असे म्हणत दहशत निर्माण केली. त्यानंतर त्याने दांडक्याने शाहरूखला बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.




























































