
साई भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हाताने स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साईभक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधीपुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येण्या-जाण्याकरिता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिकेट्स काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे. ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
तसेच संस्थान प्रशासनाने गावक-यांच्या मागणी विषयी सकारात्मक भुमिका दर्शविली याबाबत सर्व उपस्थित गावक-यांनी आनंद व्यक्त केला. तसेच सकारात्मक वातावरणात सभा समाप्त झाली. याप्रसंगी राजेंद्र गोंदकर, सुधाकर शिंदे, प्रताप जगताप, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, सचिन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, महेंद्र शेळके, प्रकाश शेळके, संजय शिंदे, रमेश गोंदकर, सचिन शिंदे, संदीप सोनवणे, अशोक कोते, सुजित गोंदकर, विजय गोंदकर, सुमित शेळके, अशोक गोंदकर, गजानन शेर्वेकर, अमित शेळके व अमृत गायके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


























































