शिरीषायन: बायको माहेरी गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

काल बायको माहेरी गेली.
बोलण्यात बहुमोल वेळ दवडण्यापेक्षा मी हसून, गाऊन, नाचून माझा आनंद साजरा करावा, हे तुम्हाला कळते आणि मला कळत नाही का?

माझ्या एका जवळच्या मित्राने माझी बायको माहेरी गेल्याचे असूयेने स्वतःच्या बायकोला सांगितले. तत्काळ स्वयंपाकघरातून त्याच्या दिशेने एक भांडे भिरभिरत आले. तिचा नेम किती अचूक आहे, याचे कौतुक करायची वेळ नव्हती. त्याने मला कपाळावरचे मोठे थोरले टेंगूळ दाखवले. (मी तर त्याला नेहमीच दाखवतो) त्याची बायको भांडय़ाला पोचा आला म्हणून (स्वतःचं) कपाळ बडवीत बसली होती.
‘तुझ्या बायकोचे माहेर जवळ आहे ना?’ मी आस्थेने विचारले. ‘तोच तर प्रॉब्लेम आहे,’ मित्र हताशपणे म्हणाला. सासूबाई येणार म्हटल्यावर तो असा हताश होतो. एकदा तर तो सासऱयाच्या खांद्यावर मान टाकून रडल्याचे सांगतात. ‘तोच तर प्रॉब्लेम आहे. त्या तासाभराच्या अंतरावर राहतात. ही सकाळी जाते आणि संध्याकाळी परत येते. ती गेल्याचा आनंद करावा तर ती परत आलेली असते. ती परतल्यावर कसला बोडक्याचा आनंद! मला तर संशय आहे की, मला आनंद उपभोगता येऊ नये म्हणून ती धावत पळत येते. मग तक्रार करीत बसायचे की पाय दुखतात म्हणून. अरे तुला सांगतो, मी लास्ट टाइम ग्लास भरला आणि ही दारात उभी.’

माझ्या बायकोच्या माहेरी जाण्याने माझ्या मित्राच्या वैवाहिक जीवनात वादळ निर्माण व्हावे याचे मला वाईट वाटले. मला शक्य असते तर त्याच्या सासूरवाडीला मी राजस्थानात पाठविले असते. मग भर म्हणावं ग्लासांवर ग्लास. बादलीच भरून ठेव व आरामात रिती कर.

एका सासऱयाने फोन केला. तो लेकीऐवजी जावयाने घेतला. ‘काय म्हणताय जावईबापू, कसे आहे तुमच्याकडचे वादळ?’
‘वादळ ना? आत पलंगावर लोळतंय. बोलावून आणू का?’

जावयाला सकाळीच आलेले पाहून सासूला आश्चर्य वाटले.
‘आज एकदम सकाळीच?’ सासूने विचारले.
‘तुमच्या मुलीशी काल रात्री माझे कडाक्याचे भांडण झाले. ती मला म्हणाली, मसणात जा म्हणून मी आलो.’

मुलींची लग्ने व्हावीत यासाठी बायामाणसे प्राणपणाने धडपडतात, पण एकदा लग्नं झाली की, या मुलींनी कायम आपल्याकडेच माहेरी राहावे यासाठी जीव पाखडतात. हा काय प्रकार आहे? मग त्यांची लग्नं कशाला करून देता? नुसत्याच बिनलग्नाच्या तुमच्याकडे होत्या त्या काय वाईट होत्या? मधल्या मध्ये एका पुरुषाला बळी का दिलात? त्यांना केवळ लग्नाचा शिक्का हवा असतो. लग्नाचे जोखड नको असते.
एक बायको नवऱयाशी भांडून कायमची म्हणून माहेरी जाते. त्याचा अधूनमधून फोन येत असतो. शेवटी ती वैतागून म्हणते, ‘एकदा सांगितले ना की मी येणार नाही म्हणून? परत परत काय विचारता?’

‘तसं नाही गं,’ नवरा समजुतीच्या सुरात म्हणाला, ‘न येण्याच्या निर्णयावर तू ठाम आहेस ना, याची खात्री करून घेण्यासाठी मी अधूनमधून फोन करीत असतो.’
‘बायको ही नवऱयाचं अर्धांग असते.’ एक नवरा म्हणाला.
बायको सुखावली.
‘अनेकांना आपल्याला अर्धांगवायू झाल्यासारखे वाटते.’ नवरा म्हणाला.
‘तुमच्या घरातल्या कोणालाच सौंदर्यदृष्टी नाही.’ एक बायको नाक उडवून म्हणाली.
‘त्यांनी तुला पसंत केले तेव्हाच तुला कळायला हवे होते.’ नवरा म्हणाला.
‘तुम्हाला संस्कार कशाशी खातात माहीत नाही.’ बायको तावातावाने म्हणाली.
‘लोणचे, चटणी काहीही तोंडी लावणे चालते.’ नवरा म्हणाला.
‘आपण टाकलेले पाऊल चुकीचे होते असे तुझे आयुष्यात कधी झालेय का?’ एका नवऱयाने लाडात येऊन बायकोला विचारले.
‘एक नाही, सात पावले.’ बायको उत्तरली.
सौ सोनार की एक लोहार की!
‘तुझे माझे पटेना, तुझ्यावाचून जमेना’ असे नवरा-बायकोचे नाते असते असे बोलले जाते. त्यातला पटेना हा भाग सर्वमान्य आहे. तुझ्यावाचून जमेना हा भाग उभयपक्षी अमान्य असतो. ‘इगो’ आड येतो. पुरुषांना ‘इगो’ असतोच असतो, पण अलीकडे बायकांनाही कमी नसतो. नवऱयाला उलटून बोलायचे नाही ही शिकवणूक इतिहासजमा झाली. बायकोला बरोबरीने वागवायचे हा फंडा पुरुषांना अभावानेच मान्य असतो. मग काय होणार? तेच होते जे होतेय. ‘मी चांगला, ती वाईट’ किंवा ‘मी चांगली, तो वाईट’ इथे येऊन सर्व थांबते. त्यानंतर केवळ काळ लोटणे सुरू होते. देव कोणा एकाला बोलावून घेईपर्यंत!
जाऊ द्या झाले. आपण सुरुवातीच्या खेळकर मूडमध्ये येऊया. माझी बायको माहेरी गेली याचा मला म्हणण्यासारखा आनंद झाला नाही. कारण ती परत येणारच आहे. मांजरी काही काळासाठी बाहेर गेली तर लगेच आपण जल्लोष करतो का…?

– [email protected]