खाणं आणि बरंच काही : चविष्ट क्रियापदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आरती देवगावकर

स्वयंपाकघरातल्या प्रत्येक भांडय़ाला जसं त्याचं त्याचं नाव असतं तसंच इथल्या प्रत्येक कृतीलाही विशिष्ट क्रियापद असतं. कांडणे, लाटणे, पाखडणे, दळणे, मुरवत ठेवणे, कोळ काढणे अशी अनेक. पदार्थाला चव आणणारी ही क्रियापदं आपल्या भाषासंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत.

आज ना मला स्वयंपाकाचा फारच (कंटाळा/उत्साह आला आहे)… मी पोळी-भाजी (केली/खाल्ली)… आंबट वरणाला तिखट (विसरले/जास्त झाले)… गोडाचं आणि माझं अगदी (वाकडं आहे/सख्य आहे)… यातील कंसात असलेले शब्द वगळून जरा वाचा बघू. विचार करा असं कुणी आपल्याशी बोलायला लागलं तर काही अर्थबोध होईल का हो? मला तरी नाही होणार. का म्हणून काय विचारता, यात क्रियापदे नाहीत ना, म्हणून! क्रियापद हे कोणतीही क्रिया झाल्याचे, होत असल्याचे, होणार असल्याचे दर्शवते. ते काळाला, कर्त्याच्या लिंगाला, वचनाला, क्रियेच्या प्रकाराला अनुसरून बदलते. यात अजूनही काही प्रकार आहेत, पण मी काही त्यात पडत नाही. आपले सदर खाण्याबद्दल बोलणार आहे. इथे भाषेच्या व्याकरणाचे काय काम, असा प्रश्न तुम्हा वाचकांना पडला तर साहजिकच आहे. मी हे बोलतेय कारण आज मला आपल्या पाककलेशी निगडित असणारी क्रियापदे तुमच्या समोर मांडावीशी वाटत आहेत. आपण लहानपणापासून हे ऐकत-बोलतच मोठे झालो, पण या लेखाच्या निमित्ताने ती अशी एकत्र आणावीत असं वाटलं.

बघा हं, आपण बाजारातून किराणा माल आणायच्या आधी त्याची यादी बनवतो. गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये चाळतो, पाखडतो, निवडतो आणि मग दळून आणतो. भरलेल्या लोंबीतले तांदळाचे दाणे भात कांडल्याशिवाय मुळी दुकानातच येत नाहीत. त्याला किती पॉलिश केले यावर त्याची किंमत ठरते. तसेच त्यावर आंधणाचे पाणी ओतून ते कांडून पोहे बनतात. शेंगदाणे, रवा या गोष्टी भाजतो. भाजलेल्या दाण्याची साले काढतो, कूट करतो. मात्र मसाल्याचे पदार्थ भाजून बारीक करतो तेव्हा कुटले म्हणत नाही, तर दळून बारीक केले, करावे म्हणतो. मिरची कांडून घेतो. वाळवणाचे पदार्थ करताना त्याला कडकडीत उन्हात वाळवतो. पावसाळा झाला की, काही बेगमीच्या पदार्थांना क्वचित वेळा पुन्हा एखादे उन्ह दाखवतो. लोणचे घालतो. साखरेच्या पाकात, लिंबाच्या रसात, गार केलेल्या फोडणीच्या थराखाली फोडी मुरवतो.

आपण कधी हलके शेकतो, कधी नुसते गरम करतो, तर कधी उकळतो. पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी लागणारे मोहन गार आणि कुरकुरीत हवे असेल तर तेल कडकडीत गरम करतो. कसेही वापरले तरी हे मोहन पिठाला चोळून घेतो, अगदी त्याचा मुटका वळला जातोय ना याची खात्री होईपर्यंत नंतर ते पीठ लागेल तशा दूध-पाण्याने मळतो. रोजची कणीक मळतो. हीच मळलेली कणीक पुरणपोळीसाठी तेल-पाणी लावून तिंबून घेतो, शंकरपाळी किंवा करंजी करताना आधी घट्ट मळतो आणि मग वरवंटय़ाने चेचून घेतो. एखाद्या भाजीच्या किंवा आमटीच्या फोडणीला घालताना लसूण कधी चेचून घालतो, कधी बारीक तुकडे करून, तर कधी अगदी गंधासारखा बारीक वाटून. भाकरी झाल्या की त्याच गरम लोखंडी तव्यावर चमचाभर तेलावर परतलेल्या मिरच्या आणि लसूण मीठ घालून खरडून घेतो की, झटपट चटपटीत तोंडी लावणे तयार!

बऱयाच घरात आमसूल/कोकम/आमचूर यापैकी काहीही रोजच्या वापरात असेल, पण भेळ, पाणीपुरीची मजा चिंचेच्या आंबटगोड चटणीशिवाय अधुरी. त्यासाठी चिंच भिजत घालून कोळून घेतो. आमसुलाचाही असाच कोळ काढून केलेली सोलकढी प्यायल्यावर पित्त शमल्याशिवाय राहत नाही. एरवी चटणीत घालायला ओला नारळ खवतो, सुके खोबरे किसतो, तीळ, जवस वगैरे परततो. कोशिंबिरीसाठी काकडी चोचवतो, गाजर किसतो, कांदा बारीक चिरतो. सगळे घटक एकत्र केल्यावर आयत्यावेळी कोशिंबीर कालवतो.

आपण ढोकळा पण वाफवतो आणि उकडीचे मोदकही. आंबवून घेतलेल्या डाळ-तांदळाची इडलीसुद्धा वाफवल्यावर फुगते. रोजच्या स्वयंपाकातील पदार्थ आपण शिजवतो, वाफवतो, परततो, भाजतो, तळतो, उकळतो. हल्ली काय नुसते बटरवर-तेलात भाज्या सॉते करतो, स्टर फ्राय करतो. कधी काही भाज्या मुख्यत्वे पालेभाज्या ब्लांच करतो, डबल बॉईल करतो, तेवढेच डाएट सांभाळायचे सुख. त्याआधी पालेभाज्या खुडतो. कडधान्ये आधी भिजत घालतो, मोड आणतो. कधी काही जिन्नस तव्यावर भाजतो, कधी थेट गॅसवर, गावामध्ये अजूनही चुलीच्या निखाऱयावर धूर देत भाजायची पद्धत आहे. सौर चुलीवरदेखील सावकाशीने पदार्थ शिजत राहतात. अशा स्लो कुकिंग पद्धतीने केलेल्या स्वयंपाकाची चव काही औरच असते. शिळी पोळी कुस्करून तयार होणारे माणिक पैंजण म्हणजे घरोघरी आवडता पदार्थ. दूध हा अत्यावश्यक घटक. ते पहिल्यांदा वर येईपर्यंत तापवतो. थंड करतो नी साय काढतो. तिला विरजण लावून दही बनवतो. ते घुसळून ताक करतो. वर तरंगते लोणी बाजूला काढून कढवतो. काही वेळा पदार्थ करपतात, जळतात. त्याची हलकी खरपूस खरपुडी काहींना आवडते.

पीठ चाळतो, थालीपीठ थापतो, पोळी किंवा पुरी लाटतो, धान्य फुलवून लाह्या करतो. वडय़ा घोटतो, जायफळ उगाळतो. सकाळी दुधात साखर विरघळवतो, कॉफी पावडर फेटतो आणि लोणचे करताना मोहरी फेसतो. चहा उकळतो, गाळतो. नारळ, सुपारीसारखी कडक कवचाची फळे फोडतो. विडय़ात घालायला सुपारी कातरतो. पनीर करण्यासाठी दूध नासवतो. गव्हाच्या खिरीसाठी पाणी लावून गहू सडतो. धान्य कुजवून दारूही करतो.

अशी एक ना अनेक क्रियापदे! सगळीच काही एका लेखात मांडणे शक्य नाही. यात लिहिली त्यापेक्षा अधिक तुम्हालाही आठवतील. मला आठवणीने कळवा बरं का ती… तोवर मस्त खा नि स्वस्थ राहा.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

– [email protected]