
नवनाथ शिंदे
शिक्षा भोगण्यासाठी आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली जाते. प्रत्यक्षात मात्र, कारागृहात विविध कारणांमुळे दोन गटात वादविवाद होउन थेट खुनी हल्ल्यापर्यंतच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील काही महिन्यांत कारागृहात हाणामारीच्या घटनांमुळे कैद्यांना खुन्नस काढण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याशिवाय वारंवार घडणाऱ्या घटनांपासून बोध घेतल्यानंतरही येरवडा कारागृह प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करत आहे की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
विविध गुन्ह्यातील आरोपींची सुधारणा व्हावी, त्यांच्यामध्ये कायद्याच्या दृष्टीकोनातून दहशत बसण्यासाठी येरवडा कारागृहात रवानगी केली जाते. त्यामुळे बहुतांश कैद्यांमध्ये आमुलाग्र बदल होउन ते सामाजिकतेच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. मात्र, दहशत आणि दादागिरी करीत वर्चव वादातून थेट येरवडा कारागृहातील बरकीतमध्ये किरकोळ कारणावरून कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बराकीतील कैद्यांनी एकमेकांना फरशीचे तुकडे फेकून मारल्याची घटना नुकतीच घडली. त्यांनी कारागृहातील हवालदाराला धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी समीर शकील शेख, तरंग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासाहेब जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कारागृहातील हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, मे महिन्यांत येरवडा कारागृहातच पिण्याचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली. घटनेत दोन कैदी जखमी झाले होते. याप्रकरणी टिकलसिंह गब्बरसिंह, अजिनाथ लक्ष्मण गायकवाड यांना अटक करण्यात आली. मारहाणीत कैदी सोनू शेटे, किशोर मंजुळे जखमी झाले होते.
कारागृहात रवानगी केल्यानंतर सराईतांसह गुंडांचे गट पडतात. त्यामुळे किरकोळ वादातून थेट खुनी हल्ल्याच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कारागृहात 29 जूनला मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून दोन कैद्यांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मुकुल रेवणसिद्ध कांबळे आणि सुशांत सुरेश शिंदे (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजय शामराव सोनवणे ऊर्फ पपड्या (वय 24 रा. गेरवाई, जि. बीड) याने तक्रार दिली आहे. दरम्यान खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले. ही घटना येरवडा कारागृहातील बरक क्रमांक आठच्या बाहेरील शौचालयाजवळ घडली होती येरवडा पोलिसांनी शाहरुख उर्फ पप्या रशीद शेख, अमन रियाजअन्सारी आणि सलीम शब्बीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तुषार हंबीर याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला.
राज्यातील काही कारागृहातही होतेय हाणामारी
राज्याच्या काही कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे संबंधित कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड मारला होता. येरवडा मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर खुनी हल्ला केला. सांगलीसह कोल्हापूर परिसरातील सराईत गुन्हेगार महंमद जबाल नदाफ (वय-35 रा. सांगली) हा गंभीर जखमी झाला होता. हिंदूराष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंबीर याच्यावर दगडाने व खिळ्याने तिघांनी खूनी हल्ला केला होता. त्यामुळे कारागृह प्रशासनाचा कैद्यांवर वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.


























































