नगर जिल्ह्यातील 1471 शिक्षक ठरले बदलीसाठी पात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा असणाऱया जिह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची यादी अखेर ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध झाल्याने बदलीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱया शिक्षकांचा जीव आता भांडय़ात पडला आहे. जिह्यात कार्यरत 11 हजार शिक्षकांपैकी 1 हजार 471 शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले असून, बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची संख्या देखील 794 आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्याने त्यांच्या तालुक्यात शिक्षकांच्या रिक्तपदाची संख्याही ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या बदली पात्र शिक्षकांची संख्याही 1 हजार 471 आहे. यात संबंधित प्राथमिक शिक्षकांनी एकाच शाळेत पाच वर्षे सेवा केलेली असून, सोपे अथवा अवघड क्षेत्रात दहा वर्षे सेवा दिलेली आहे. तर, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांमध्ये अवघड क्षेत्रात किमान 3 वर्षे सेवा दिलेली आहे. बदली पात्र शिक्षकांची संख्या ही दीड हजारांच्या जवळपास असल्याने यातील किमान निम्मे शिक्षक गैरसोय टाळण्यासाठी बदलीला नकार देण्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आहे. यामुळे यंदा 700 ते 750 शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांमध्ये उपाध्यापक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

रिक्त जागांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड झाल्यावर वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग 1 आणि विशेष संवर्ग 2 या प्रवर्गातील शिक्षकांना स्वतःच्या बदलीसंदर्भातील माहिती पोर्टलवर टाकावी लागणार आहे. ही माहिती पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यावर या संवर्गातील बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध होऊन पुढे बदलीची प्रक्रिया होणार आहे.

वेळापत्रकापेक्षा संथ प्रक्रिया

शिक्षकांच्या बदल्यांसाठी 31 ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून, ग्रामविकास विभागाच्या आदेशात कोणत्या तारखेला काय करावे, याचे नियोजन करून देण्यात आलेले आहे. मात्र, नगर हा मोठा जिल्हा असून, शिक्षकांची संख्या 11 हजार असल्याने माहिती भरण्यास आणि पुढील प्रक्रिया राबवतांना वेळ जात असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.