
मागील भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांना धाक दाखवण्यासाठी थेट तलवार काढण्यात आली. पोलिसांनी तलवारीसह एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रवी अर्जुन भोसले यांनी तक्रार दाखल केली. भाजी आणण्यासाठी ते घराबाहेर आले असता त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा आकाश सुभाष कांबळे हा त्यांच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करू लागला. माझ्या वडिलांना पूर्वी शिवीगाळ केली होती म्हणून मागील भांडणाची कुरापत काढून त्याने तक्रारदारास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी शेजारी आले असता आकाशने घरात जाऊन थेट तलवार आणली आणि माझ्या नादाला लागलास तर बघून घेईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फोन करून कळवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून तलवारीसह त्याला ताब्यात घेतले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































