
यंदाच्या टी-20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या फियास्कोपासून आपण आताच धडा घ्यायला हवा. आताच्या वेगवान खेळाच्या युगात टीम इंडियानेही टी-20, वन डे (व्हाईट बॉल) आणि कसोटी (रेड बॉल) क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे संघ आणि प्रशिक्षक स्टाफ नेमायला हवेत. आपण त्यासाठी इंग्लंडकडून धडा घ्यायला हरकत नाही, असे परखड मत लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.
यंदा टी-20 चे विश्वविजेतेपद पटकावणाऱया इंग्लंडने गेल्या काही वर्षांपासूनच आपले पांढरा चेंडू आणि लाल चेंडू या प्रकारांचे दोन वेगवेगळे संघ तयार केले आहेत. या संघांचे कर्णधार, प्रशिक्षकही वेगवेगळे आहेत. इंग्लंडच्या टी-20 आणि वन डे संघाचा कर्णधार जोस बटलर तर कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा आहे.
टी-20 संघाला विजयासाठी अधिकाधिक तज्ञ आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंची आवश्यकता असते. बीसीसीआयनेही या पद्धतीने संघाची विभागणी आणि बांधणी करावी असे आवाहन माजी विक्रमवीर गोलंदाज अनिल कुंबळे यांनी केले. ते म्हणाले, विद्यमान टी-20 जगज्जेता आणि माजी जगज्जेता ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांत अष्टपैलू क्रिकेटपटूंचा मोठा भरणा आहे.


























































