
अकोल्यातील वाघेरे येथील एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना 14 लाखांचा गुटखा मिळून आला आहे. याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दत्तात्रय गजे (रा. वाघेरे, ता. अकोले) आणि भारत ट्रेडर्सचे मालक वसीम तांबोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, तांबोळी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून बंदी आदेश पारित झाल्यानंतरदेखील अकोले तालुक्यातून अनेक दिवसांपासून बिगर आदिवासी व आदिवासीबहुल भागातून सर्वदूर गुटखा विक्री खुलेआम होत आहे. ढाबे, छोटय़ा-मोठय़ा हॉटेलमधून, पानटपरी ते किराणा मालाच्या दुकानातून गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे.
अकोले तालुक्यातील वाघेरे शिवारातील एका घरातून रविवारी दुपारी 14 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई गेल्या काही वर्षांतील पहिलीच मोठी कारवाई आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. दोन पिकअप गाडी भरून हा माल आहे. एकूण 157 गोण्या, एका गोणीत 120 पुडे असा 14 लाखांचा हा मुद्देमाल वाघेरे येथील दत्तात्रेय गजे यांच्या राहत्या घरात मिळून आला. हा सर्व गुटखा अकोले शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक भारत ट्रेडर्स यांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी भारत ट्रेडर्सचे संचालक वसीम तांबोळी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबरोबरच अन्न व औषध विभागास ही माहिती देण्यात आली आहे.































































