
उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे राज्यातील विविध शहरांतील किमान तापमानाचा पारा सातत्याने खाली येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संभाजीनगर येथे सातत्याने राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद केली जात आहे. आज देखील संभाजीनगर येथे राज्यात सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस एवढय़ा किमान तापमानाची नोंद झाली. तर, पुण्यातील देखील पारा सातत्याने घसरत असून, आज पुण्यात 12.9 अंश सेल्सिअस एवढय़ा किमान तापमानाची नोंद झाली.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱया गार वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढत आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने पहाटे थंडी आणि दुपारी चटका अशी स्थिती आहे. उत्तरेकडील थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांचे किमान तापमान : (अंश सेल्सिअस)
मुंबई 23.6, रत्नागिरी 20.3, पुणे 12.9, लोहगाव 14.9, जळगाव 14.5, कोल्हापूर 17.1, महाबळेश्वर 12.8, मालेगाव 18.8, नाशिक 13.9, सांगली 15.8, सातारा 13.4, सोलापूर 14.7, संभाजीनगर 12.5, परभणी 14.1, नांदेड 14.8, अकोला 15.2, अमरावती 13.8, गोंदिया 13.5, नागपूर 14.8, वर्धा 14.0.



























































