काळजी वाढली! मुंबईत गोवर संशयितांचा आकडा 3 हजार 378 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवरचा कहर सुरू असून गोवर संशयितांचा आज आकडा 3 हजार 378 वर पोहोचला आहे. तर आज नालासोपारा येथील एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि महामुंबईतील मृतांचा एकूण आकडा 11 वर पोहोचला आहे. तर 220 जणांमध्ये गोवरचे निदान झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढत असून गोवर मुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आज मृत्यू झालेल्या नालासोपारा येथील मुलाने गोवर प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्याला श्वसनाचा त्रास, अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणे होती. या मुलाचा गोवर संशयित मृत्यू झाला असून डेथ कमिटीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढत असून मुंबईतील झोपडपट्टी भागात गोवरचा हा उद्रेक दिसत आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळले आहेत. तर काल गोवंडी येथील 1 वर्षें तीन महिन्याच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला होता.

32 लाख घरांचे सर्वेक्षण

मुंबईत सोमवारी दिवसभरात 170 संशयित रुग्णांची नोंद झाली असून 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 42 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पालिकेकडून मुंबईत आतापर्यंत 32 लाख 33 हजार 068 घरांचे सर्वेक्षण, तपासणी आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात 2 लाख 97 हजार 74 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. संशयितांना जीवनसत्त्व ‘अ’ च्या गोळ्या देण्यात आल्या. शिवाय लसीकरण मोहीमही राबविण्यात येत आहे.