मेन राजाराम हायस्कूल स्थलांतराचा डाव कोल्हापूरकरांनी उधळून लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात ऐतिहासिक जुना राजवाडय़ाचा भाग असलेल्या हेरिटेज इमारतीमधील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित करण्याचा डाव अखेर उधळला गेला आहे. कोल्हापूरकरांनी याबाबत तीव्र आंदोलन उभारल्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल रात्री या शाळेच्या कोणत्याही प्रस्तावास मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओप्रमाणे ही वास्तू कोणाच्या घशात जाऊ नये, यासाठी मेन राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराला सर्वपक्षीय कृती समितीने कडाडून विरोध करत 15 दिवसांचा इशारा दिला होता. त्यामुळे आता परत बैठक घेऊन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.

करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱया पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी परिसरातील सरकारी इमारतींची पाहणी केली होती. यात मेन राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराच्या कोणत्याही प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नसल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार नाही. याबाबत जाहीर केले होते, तरीही गैरसमजातून आंदोलन झाले. मात्र, स्थलांतराच्या कोणत्याही प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. या हायस्कूलला भेट दिली असताना विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत आवश्यक बाबींची नोंद घेतली असून, या सुविधा वर्षभरात उभारण्यात येतील. तसेच मेन राजाराम हायस्कूलच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाहीही पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकात दिली आहे.