म्हाडाच्या परीक्षेत झाला झोल, 60 मुन्नाभाईंविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या नोकरभरती प्रक्रियेत डमी उमेदवार बसवून परीक्षा देणाऱया 60 मुन्नाभाईंविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरभरतीत कॉपी झाल्याचा प्रकार समोर आल्यावर म्हाडाने चौकशी समिती तयार केली. त्या समितीने 150 पानांचा अहवाल पोलिसांना दिला. त्या अहवालाच्या आधारे खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी म्हाडाने तांत्रिक आणि अतांत्रिक अशा 14 संवर्गातील 565 पदे भरण्याचा निर्णय घेतला. सरळ सेवा भरतीद्वारे ही भरती केली जाणार होती. त्या वेळेस कोविड असल्याने एका आयटी कंपनीच्या माध्यमातून उमेदवाराची परीक्षा घेण्याचे ठरले. यंदाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 106 केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांची परीक्षा घेतली होती. परीक्षेदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाणे, डमी उमेदवार बसणे असे प्रकार लक्षात आले. त्यामुळे 9 उमेदवारांविरोधात बीडच्या शिवाजीनगर, पवई, सातारा तालुका, बडनेरा पोलीस ठाणे, नागपूर एमआयडीसी पोलीस ठाणे, नाशिक शहर पोलीस ठाणे, अमरावतीच्या नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोविड काळात ऑनलाइन परीक्षा असल्याने उमेदवाराचे बायोमेट्रिक घेता आले नव्हते. तेव्हा परीक्षेला आलेल्या उमेदवारांचे फोटो घेतले होते. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या परीक्षेचा निकाल लागला. म्हाडाने 1663 उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलावले. त्यांची कागदपत्रे तपासणी केली. तेव्हा 60 उमेदवारांना संशयित वर्गवारीमध्ये समाविष्ट केले. त्या संशयित उमेदवारांमध्ये एका महिलेने स्वतःच्या फोटोऐवजी आधारकार्ड अपलोड केले होते. म्हाडाने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज आणि लॉग डिटेल्स तपासले. तसेच म्हाडाने एक अहवाल तयार केला.

60 पैकी 39 उमेदवारांनी बसवले डमी उमेदवार
21 जणांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर आणि संशयास्पद आढळून आले
संभाजीनगर, पुणे, नाशिक येथील 5 उमेदवारांनी पहिल्या तासात 43, तर दुसऱया तासात 256 प्रश्न सोडवले
संभाजीनगरच्या एका उमेदवाराने पहिल्या तासात शून्य, तर दुसऱया तासात 171 प्रश्न सोडवले. तो खिशात काही ठेवत असल्याचे सीसीटीव्हीत कैद
संभाजीनगर, नाशिक, पुणे, धाराशीव, बीड, सोलापूर, जालना, कोल्हापूर, नागपूर, येथील उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल