भाजपच्या गुजरात विजयामध्ये चर्चा योगी आदित्यनाथांची; प्रचारसभांसाठी होती सर्वाधिक मागणी, इतक्या ठिकाणी खेचून आणली विजयश्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वशक्ती वापरल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचा परिणामही भाजपच्या ऐतिहासिक विजयात झालेला दिसला. गुजरात मोदी-शहांच्या यांचं गृहराज्य म्हणून ओळखला जात असला तरी यंदा भाजपच्या विजयात चर्चा आहे ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची. त्याचं कारणही तसंच आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारात त्यांचा स्ट्राइक रेट 72% असल्याचं दिसत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ज्या 11 जागांवर पराभूत झाला होता, जिथे काँग्रेस आणि अपक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळी त्या 11 जागांपैकी पाच जागा यंदाच्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या. विशेष म्हणजे या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आले होते.

योगी आदित्यनाथ यांनी 25 मतदारसंघांमध्ये प्रचार केला ज्यापैकी भाजपने 18 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथांच्या सभांसाठी पक्षाच्या उमेदवारांकडून खूप मागणी होती.

आकडेवारीतून स्पष्ट होते की 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या 25 जागांपैकी 11 जागा काँग्रेस किंवा अपक्षांनी जिंकल्या होत्या. रापर, ध्रंगध्रा, सावरकुंडला, विरमगाम आणि धंधुका – या पाच जागांवर भाजपने विजय मिळवत काँग्रेसला धक्का दिला. तर पोरबंदर, गरियाधर आणि वाघोडिया सारख्या काही जागांबाबत असे घडले नाही ज्या अनुक्रमे भाजपमधून काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्षांकडे गेल्या.

हिमाचल प्रदेशात आदित्यनाथ यांचा प्रचार फारसा परिणामकारक ठरला नाही. त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

योगींनी हिमाचल प्रदेशातील 16 जागांवर प्रचार केला ज्यापैकी भाजपला सहा जागा जिंकता आल्या. निकालातून स्पष्ट होते की काँग्रेसने सहा जागांवर विजय नोंदवला – कसौली, जावली, जावलामुखी, घुमारविन, दून आणि गाग्रेट – ज्या पूर्वी भाजपकडे होत्या.

तज्ज्ञांनी सांगितले की योगी काँग्रेसवर सातत्याने टीका करत होते आणि लोकांना ‘महात्मा गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस विसर्जित’ करण्यास सांगत आहेत. आदित्यनाथ यांनी गुजरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यासारखे नेते कसे दिले यावर विशेष जोर दिला होता.

त्याचवेळी त्यांनी पहिल्यांदाच गुजरात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षावर (आप) हल्ला चढवला होता. तज्ज्ञांनी सांगितले की योगींनी AAP वर टोकदार हल्ला केला आणि त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘नमूना’ म्हणून संबोधले होते.