रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या ‘त्या’ विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्रमध्ये बुधवारी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये अडकलेल्या ‘त्या’ एमसीएच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आंध्र येथील दुव्वाडा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली होती.

शशिकला असे त्या विद्यार्थीनीचे नाव असून ती 20 वर्षांची होती. एमसीए (कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये मास्टर्स) शिकणारी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी, अण्णावरमहून दुव्वाडा येथे कॉलेजला जात होती. मात्र गुंटूर-रायगडा एक्सप्रेसमधून उतरत असताना तिचा पाय घसरला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली. ती अशाप्रकारे अडकली की तिला हालचालही करता येत नव्हती. तिच्या बचावासाठी आरपीएफचे जवान आले आणि त्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून तिची सुटका केली होती.

त्यानंतर तिला विशाखापट्टणम येथील रुग्णालयात नेले. यात तिला रक्तस्त्राव झाला आणि या घटनेमुळे तिच्या मूत्राशयाला दुखापत झाली होती. तिच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी तिने अखेरचा श्वास घेतला.