
>> मंजिरी भालेराव
साताऱ्यापासून 35 कि.मी. आग्नेयेला वाई नावाचे एक छोटेसे नगर आहे. वाईमधील सर्वात जुने असे उभे असलेले मंदिर म्हणजे ढुण्डिविनायक मंदिर मात्र खुद्द वाईकरांनाही फारसे महत्त्वाचे वाटत नाही. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करत आहेत. हे मंदिर कोणी बांधले याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व लक्षात आणून देतात.
हे मंदिर नदीच्या काठावरती एका पीठावर बांधले आहे. त्यावर बाह्य भागावर काही शिल्पे कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या दरवाज्यावरच्या ललाट बिम्बावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठय़ावर कीर्तिमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठय़ा दगडातच केले आहे. गाभाऱयात गणपतीची मूर्ती आहे. परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून जरा बाजूला भिंतीपाशी ठेवला आहे.
या मंदिराच्या आवारात सहा संन्याशांच्या समाध्याही आहेत. त्यांची नावे जरी माहीत नसली तरी त्या संन्याशांच्या आहेत हे लोकांना माहीत आहे. तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील साधना करणाऱया योग्याचे शिल्प आहे. त्यामुळे या मंदिराचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते की, या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यांनतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षासन पुढे सुरू ठेवले असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट होते. वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम हे पेशवाईतील असल्यामुळे त्यामधे हे सर्वात प्राचीन ठरते. यादव काळ ते शिवकाल यामधल्या काळातील फारशी मंदिरे सापडत नाहीत. त्यामुळे या परिसरात असलेल्या या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे. त्यातही ते गाणपत्य संप्रदायाची या परिसरातील लोकप्रियता स्पष्टपणे दाखवते.

























































