
>> प्रा. अनिल कवठेकर
प्रेमाच्या पलीकडे असते भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली करुणा आणि अशा करुणेतून उमललेले प्रेम अत्यंत सुंदर, पवित्र, विशुद्ध आणि विलक्षण वेगळे असते. प्रेमाचा खरा अर्थ मांडणारं असंच एक गाणं…
एखादी व्यक्ती आवडली की, आपण तिच्या प्रेमात पडतो. आपल्याला कधी, कधी तिचा रंग आवडतो. कधी तिचा स्वभाव आवडतो. कधी त्या व्यक्तीचे लिखाण आवडते; पण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. त्यामुळे प्रेम ही फार सोपी गोष्ट आहे, असे मला जाणवते. प्रेमाच्या पलीकडे काय, तर प्रेमाच्या पलीकडे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली करुणा आहे. करुणा याचा अर्थ त्या व्यक्तीविषयी वाटणारी सहानुभूती, आपुलकी, कणव, माया. त्याच्यासाठी काही करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार न येणे. या अहंकाराशिवाय जेव्हा त्या एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटतं तेव्हा अशा करुणेतून उमललेले जे प्रेम असते ते प्रेम अत्यंत सुंदर, पवित्र, विशुद्ध आणि विलक्षण वेगळे असते. आज मी अशाच एका गाण्यावर चर्चा करणार आहे. ज्या गाण्यांमध्ये नायकाला नायिकेबद्दल वाटणाऱया करुणेतून त्याच्या मनात प्रेम निर्माण झालेले आहे.
चित्रपटातील गाणी म्हणजे केवळ कथेला पुढे नेण्यासाठीच असतात असं नाही तर काही गाण्यांचं स्वतःचं असं अस्तित्व असतं. ही गाणी अनेक मिथकांशी जोडली गेलेली असतात ती मिथपं आपण विसरलेलो असतो. त्या कथा आपण विसरलेलो असतो. त्या जातक कथा आपण विसरलेलो असतो; पण ज्या कविने हे सगळं वाचलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये होणारी विचारांची आंदोलन आणि त्या आंदोलनातून त्यांचं होणारे लिखाण पुन्हा एकदा त्या मिथकांची त्या जातक कथांची आपल्याला आठवण करून देतात.
अशी गाणी आपल्या मनाला खूप वेगळा असा आनंद देतात. सत्य समजण्याचा आनंद हा जगातील सर्वश्रेष्ठ आनंद आहे. गाण्यांच्या शब्दांतून, अर्थातून, रचनेतून आपल्याला सत्याचा शोध लागतो आणि जाणवतं की, आपण खऱया अर्थाने आनंदी आहोत. अर्थात यासाठी चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शकही तसेच असायला हवे की, ज्यांना अत्यंत अर्थपूर्ण असे संगीत आणि गाणी हवी असतात.
आज आपण अशा या दिग्दर्शकांपैकी मनोज कुमारच्या शैलीची ओळख करून घेणार आहोत. ज्याला भारत कुमार म्हणून ओळखलं जातं. देशभक्ती हे त्याचे आवडते क्षेत्र होते; पण देशभक्ती चित्रपटात आणूनही आपण किती सुंदर चित्रपट देऊ शकतो हे त्याच्या अनेक हे त्याचे अनेक चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते. या चित्रपटात देशभक्तीपर आहेच, पण या गाण्यातून बुद्धकालीन कथाच आपल्याला ऐकायला मिळते.
बुद्ध काळातील ही गोष्ट आहे. बुद्धांच्या संघात एक अत्यंत सुंदर, राजबिंडा, देखणा भिक्खू होता. एका गावात या भिक्खू संघाचा मुक्काम होता. तो राजबिंडा भिक्खू रोज भिक्षा मागण्यासाठी गावात यायचा तेव्हा त्याला पाहण्यासाठी गर्दी व्हायची. भिक्षा वाढताना स्त्र्ाया त्याला पाहतच बसत. त्याच गावाच्या बाहेर एक अत्यंत सुंदर, श्रीमंत वेश्या राहात होती. त्या काळात वेश्येला समाजामध्ये सन्मानाचे स्थान होते. तिला नगरवधू म्हणूनही संबोधले जायचे. तिच्याकडे एवढी संपत्ती असायची की, काही वेळेस ती राजालाही कर्ज म्हणून द्यायची. ही सुंदर वेश्या आपल्या घराच्या गच्चीवर उभी राहून या भिक्खूला रोज पाहायची. हळूहळू तिचे त्याच्यावर प्रेम बसले. तो दिसावा, भेटावा, त्याने आपल्याकडे पाहावे म्हणून ती तासन्तास वाट पाहू लागली. तोही तिच्याकडे सुहास्य नजरेने पाहत असे आणि पुढे जात असे. तेव्हा तिच्या मनात चांदण्या फुलायच्या. एक दिवस तिने आपल्या दासीकडून त्या भिक्खूला सरळ आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. भिक्खू तिच्या घरी गेला. तिने त्याचे स्वागत केले व आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा तो भिक्खू म्हणाला की, मी तुझ्यासाठी एक दिवस परत येणार. नक्की परत येणार; पण तुला वाट पाहावी लागेल. तिला वाटले आठ दिवसात परत येईल. फार फार तर दोन-चार महिन्यांत परत येईल. तिने थांबायचे मान्य केले; पण तसे काही झाले नाही. महिने उलटले. वर्षामागून वर्षे गेली; पण तो काही आला नाही. त्या वेश्येचे तारुण्य संपले. तिची श्रीमती संपली. ती वृद्ध झाली. कर्जामुळे तिला आपले घर सोडावे लागले. आता ती रस्त्याच्या कडेला भीक मागत आपले जीवन जगू लागली. एकदा असेच रस्त्याच्या कडेला दुर्धर आजाराने जीवनाचे अखेरचे दिवस मोजत असताना हा भिक्खू तेथे आला आणि म्हणाला, ‘चल प्रिये. मी आलो आहे.’ तेव्हा ती त्याला म्हणाली, ‘किती उशीर केलास. आता तुला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ अत्यंत शांतपणे भिक्खू तिला म्हणाला, ‘तुला मला द्यायचं होतं ते मला नको होतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला जपणे ही माझी जबाबदारी आहे. आज तुझ्यावर कोणीही प्रेम करत नाही; म्हणून तर मी आलोय. कारण आता तुला माझी खरी गरज आहे.’
हा सगळा अर्थ मी आधी सांगितला आणि आता यानंतर त्या गाण्याच्या ओळी आणि त्या ओळींमधून आलेला अर्थ आपण पाहूया. गाण्यातला फरक एवढाच आहे की, कथेमध्ये नायक तिच्याकडे येतो आणि हे सगळं बोलून चित्रपटातील नायक तिला त्याच्याकडे बोलवतो. शेवटी नायक चित्रपटातला आहे. त्यामुळे त्याचा अहंकार त्या शेवटच्या ओळीमध्ये येतो आणि तो येणं साहजिकच आहे. भिक्खूचा अहंकार उरलेलाच नाही म्हणून तो तिच्याकडे जातो. हा थोडासा बदल लक्षात घेतला तरी कथा पूर्णपणे या गाण्यांमध्ये जशीच्या तशी बसते. ती कशी ते पाहूया.
गाणं सुरू होतं तेव्हा मनोज कुमार लंडनमधील कुठल्या तरी जुन्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या राजवाडय़ाच्या प्रांगणात उभा आहे. पण त्या राजवाडय़ाच्या प्रांगणात त्या दोघांशिवाय कोणीही नाही. हे गाणं जर मनोज कुमारने कथेची गरज म्हणून शूट केले असते तर ते नालंदा विद्यापीठाच्या प्रांगणात केले असते असे मला वाटते.
कोई जब तुम्हारा हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिये
तो तिला सांगतोय. जेव्हा कधी कोणी तुझं हृदय तोडेल, तेव्हा तू माझ्याकडे ये. मी तुझ्यासाठी उभा आहे. माझे प्रेम सच्चे आहे. तू माझ्याकडे येणार आहेस.
अभी तुमको मेरी जुरूरत नही
बहुत चाहने वाले मिल जायेंगे
अभी रूप का एक सागर हो तुम
पंवल जितने चाहोगी खिल जायेंगे
या कडव्यामध्ये मी सांगितलेल्या कथेचा सगळा सारांश येतो.
कथेमध्ये भिक्खू तिच्याकडे जातो. तो भिक्खू आहे आणि हा नायक आहे. त्यामुळे तिनेच माझ्याकडे यावे हा त्याचा थोडा अहंकार शिल्लक आहे. हेसुद्धा लक्षात येते. भिक्खू मात्र त्या अहंकाराच्या पलीकडे गेल्यामुळे तो तिच्याकडे जातो. हा एवढाच थोडासा बदल आहे. अन्यथा कथेचा भावार्थ आणि गाण्याचा भावार्थ शत प्रतिशत सारखा आहे.
जीवनाच्या सत्याकडे घेऊन जाणारं आणि प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला सांगणारं अप्रतिम असं गाणं जे मला नेहमीच ऐकतात आणि पाहताना प्रत्येक वेळी नवा संदर्भ नवा आनंद नवी ऊर्जा देत असतं.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































