प्रयोगातील समाधान महत्त्वाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल 

मराठी रंगभूमी, मालिका, हिंदी आणि गुजराती रंगभूमी या सर्व क्षेत्रात सहज वावरणारा निनाद लिमये… सध्या ‘चारचौघी’ या नाटकात  ‘श्रीकांत’ या भूमिकेमुळे तो लोकप्रिय होत आहे. निनाद हा बालमोहन शाळेचा विद्यार्थी आणि त्यामुळे विद्याताई पटवर्धन यांच्या नाटकांतून अभिनयाचे संस्कार त्याच्यावर झाले. बालकलाकार म्हणूनही त्याने ‘दे धमाल’सारख्या मालिकेत काम केले. रुईया कॉलेजला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्षी ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या एकांकिकेसाठी त्याने आयएनटीमध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.

 रुईयातर्फेच त्याने ‘आयुषमान’, ‘ग म भ न’, ‘मुक्तिधाम’ या गाजलेल्या एकांकिकांतून भूमिका करून विविध ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. या एकांकिका स्पर्धा पाहायला विपुल मेहता हे गुजराती दिग्दर्शक यायचे आणि त्यांनी एकदा निनादला गुजराती नाटकात काम करण्याविषयी विचारले. ‘एक छोकरी साव अनोखी’ या गुजराती नाटकात निनादच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि सातत्याने आठ वर्षे निनाद गुजराती रंगभूमीवर सहज वावरू लागला. सात-आठ गुजराती नाटकांचे त्याने सातशेपेक्षा जास्त प्रयोग केले.

दरम्यान, त्याचा मराठी मालिकांतही प्रवास सुरू होताच. ‘अवघाची संसार’, ‘तुझे माझे ब्रेकअप’, ‘तू तिथे मी’, ‘राजा शिवछत्रपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तसेच ‘तू माझा सांगाती’मध्येदेखील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’मध्ये ‘नवल भथेना’ ही एक पारशी व्यक्तिरेखा अशा वैविध्यपूर्ण भूमिका त्याने साकारल्या. निनाद म्हणतो,  ‘माझ्या जीवनात मकरंद देशपांडे यांच्यासारखा गुरू मला लाभला आणि माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांच्याबरोबर गेली चार वर्षे अनेक हिंदी नाटकांत मी भूमिका केल्या. ‘एपिक गडबड’ या मराठी नाटकाकरता मला झी गौरव स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड मिळाले. आता ‘चारचौघी’ या नाटकात ‘श्रीकांत’ ही व्यक्तिरेखा साकारताना मी ‘जिगीषा’ संस्थेशी जोडला गेलो.

श्रीकांत ही व्यक्तिरेखा पितृसत्ताक पद्धतीतून आलेल्या ‘पुरूषाचें प्रतिनिधित्व करते.  श्रीकांत थोडा बेजबाबदार आहे, त्याला एक पुरुषी अहंकार आहे. विविध भावनांचे तरंग एकाच व्यक्तिरेखेतून साकारायला मिळाले आहे. प्रत्येक प्रयोग हा एक अभिनेता म्हणून वेगळे समाधान देणारा आहे. आमची ‘चारचौघी’ची सगळी टीम इतकी उत्तम आहे की, प्रत्येक प्रयोग झाल्यावर प्रयोग चांगला झाल्याचं जे समाधान मिळतं ते खूप महत्त्वाचे आहे.’ निनादने ‘थिंकिस्तान’ या हिंदी वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे आणि अनेक जाहिरातींसाठी त्याने व्हॉइस ओव्हर केला आहे.