
सूर्य – मेड इन चायनाच्या यशानंतर आता सूर्य – मेड इन अमेरिका हा प्रयोगदेखील यशस्वी झाला आहे. अर्थात चायनाच्या पाठोपाठ अमेरिकेनेदेखील आपल्या प्रयोगशाळेत कृत्रिम सूर्य बनवण्यात यश मिळवले आहे. हा सूर्य ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत ठरेल असा दावा करण्यात येत आहे. चायना आणि अमेरिकेच्या या यशस्वी प्रयोगानंतर सूर्याचे अस्तित्व धोक्यात आहे का किंवा सूर्याचा अस्त जवळ आला आहे का, अशा प्रश्नांनी जोर पकडला आहे. मात्र शास्त्रज्ञ सांगतात की, सूर्याच्या अस्तित्वाला अजून 5 अब्ज वर्षे तरी धोका नाही. कॅलिफोर्नियाच्या लॉरेन्स लिवरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘न्युक्लियर फ्यूजन रिऍक्शन’चा प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. या ‘न्युक्लियर फ्यूजन’लाच ‘कृत्रिम सूर्य’ असे संबोधले जाते. परिणामस्वरूपी शुद्ध ऊर्जा (Clean Energy) निर्माण झाली. जगभरात स्वच्छ ऊर्जेचा अनंत स्रोत मिळवण्यासाठी विविध प्रयोग चालू आहेत, त्या प्रयत्नातले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. सूर्याचे अस्तित्व नष्ट होणार म्हणजे नक्की काय होणार? सूर्य प्रत्यक्षात हीलियम आणि हायड्रोजन यासारख्या वायूंनी बनलेला आहे. यामधील विखंडन भरपूर मोठय़ा प्रमाणात ऊर्जा निर्मिती करते. त्यातील काही भाग पृथ्वीवरदेखील पोहोचतात आणि काही भाग अवकाशात विखुरलेले राहतात. यातील हायड्रोजन 5 अब्ज वर्षे जवळ येताच संपुष्टात येईल. यामुळे विखंडनाची (फ्यूजनची) प्रक्रिया मंद होईल, म्हणजेच सूर्यामध्ये जास्त ऊर्जा शिल्लक राहणार नाही. यामुळे सूर्य अधिक उष्ण, अधिक मोठा होत जाईल आणि ‘रेड जायंट’ या अवस्थेत पोचेल. कोणताही तारा नष्ट होण्याची ही पहिली पायरी असते. त्यानंतर ‘व्हाईट ड्वार्फ’ नावाचा आणखी एक टप्पा येईल असे शास्त्रज्ञ सांगतात. या टप्प्यात सूर्याचा विस्तार थांबेल, मात्र त्याच्या बाहेरील पृष्ठभागावर सूर्याची ऊर्जा पूर्णपणे संपेपर्यंत स्फोट होत राहतील आणि उरलेल्या अवशेषांमधून मोठय़ा प्रमाणावर विषारी वायू आणि उष्णता बाहेर पडत राहील.


























































