मशीनमध्ये डोके अडकून तपासणी कर्मचाऱयाचा मृत्यू; खंडाळा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडाळा तालुक्यातील विंग येथील अजय इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये कंपनी तपासणीसाठी आलेल्या जितेंद्र चौधरी (वय 51, रा. पालघर) यांचा मशीनमध्ये डोके अडकल्याने जागीच मृत्यू झाला.

जितेंद्र चौधरी हे विंग येथील अजय इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीमध्ये मोल्डिंग मशीनच्या तपासणीसाठी आले होते. या तपासणीदरम्यान मोल्डिंग मशीनचे गार्ड अचानक उघडले गेले व या मशीनच्या एअर प्रेशरमुळे चौधरी यांचे डोके मशीनमध्ये अडकले. काही समजण्याच्या आतच ही घटना घडली. ऑपरेटरने प्रसंगावधान राखून मशीन बंद केले. मात्र, तोवर चौधरी याचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर चौधरी यांच्या नातेवाईकांना मुंबईवरून बोलवण्यात आले व रात्री उशिरा शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या हातात मृतदेह देण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे कंपनीमधील असुरक्षितता पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे. कंपन्या कामगारांच्या जीवाशी अशा खेळत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे. जितेंद्र चौधरी हे इलेक्ट्रिशन असून, सध्या ते प्लॅटिनम इंडस्ट्रीज पालघर या ठिकाणी काम करत होते.