
>> मलिका अमरशेख
कुणालाच माहीत नसतं नव्या वर्षाच्या हातात काय काय लपलंय. सांताक्लॉजच्या हातातल्या पोटलीत, रथातल्या पेटाऱ्यात जसं तो काय भेट देणार हे माहीत नसतं… कदाचित माहीत नसतं म्हणूनच आपण सुखी आहोत असंही! पुढलं वर्ष आपण असं असं घालवू… हे हे करूच अशी संकल्पना करतो, तर अनेक स्वप्नांना आपण जन्म देतो हे काय कमी आहे.
दूरवरून कसला तरी आवाज येतोय… नाजूक घंटा किणकिणत्या… आणि… हो टापांचा आवाज… लाल अबोली जांभळय़ा रंगछटांचा उत्सव असलेल्या आभाळातून आवाज येतोय… तो पाहा डौलदार रेनडियरचा रथ… त्यांच्या गळय़ातल्या घंटा… सांताक्लॉजच्या गोबऱया गोबऱया गालातलं आनंदी हसू… पांढऱया शुभ्र दाढीमिशातलं त्याचं गोंडस रूप… आणि रथात चंदेरी सोनेरी पेटय़ामध्ये लपलेल्या केवढय़ा साऱया भेटवस्तू… लाल टोपीवरला पांढराशुभ्र गोंडा हलतोय… त्याच्या भल्यामोठय़ा पोटावर बर्फ सांडलाय तो चमकतोय… त्याचे डोळेही हसून चमकतायत…
लहानपणी मी रुसून बसलेली, मला रुसायला कारण लागायचंच नाही. न् हे तर भलंथोरलं कारण! काय तर, ‘सांताक्लॉज आपल्या घरी का येत नाही? मला पण भेटवस्तू हव्यात. मी पण ख्रिसमस ट्री सजवणार. मी पण केक खाणार’ समजून काढता काढता पुरेवाट. शेवटी मोठा केक आणून दिल्यावरच रुसवा गेला! पण किती छान आहे कल्पना. थंडीची गार गोड चाहूल लागलेली असते आणि वर्ष संपल्याच्या संमिश्र भावना. नवीन वर्षाच्या चाहुलीची हूरहूर. कसं असेल नववर्ष? काय काय करायचं
नवीन वर्षात? याच सरत्या वर्षातला हा शेवटचा सण…
नवीन आणि ठेवणीतले कपडे घालून चर्चमध्ये जाणारे आनंदी हसरे लोक. मला वाटतं सर्व सण या एकाच कारणासाठी निर्माण झाले असावेत! लोकांनी या दिवशी तरी आनंदी, उत्साही असावं. स्वतः नटावं, घराला सजवावं, नातलग, मित्रमैत्रिणींना भेटावं. दुःख, प्रश्न, संकट विसरून काही काळासाठी नव्यानं जन्मावं, नव्या उत्साहानं, आनंदानं नव्या दिवसाला, आयुष्याला नव्या उमेदीनं सामोरं जावं. सण नसते तर या खडतर क्षणाक्षणाला नवीन पेच, नवे प्रश्न, नवीन संकट, नवीन आव्हान याला आपण कसे सामोरे गेलो असतो? हेच आनंदी क्षण आपल्याला बळ देतात, पुढल्या प्रवासाचं…
मुख्य या सणाचं कारण म्हणजे याच दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आले, म्हणून सर्व जगभरात हा दिवस मोठय़ा उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. ठिकठिकाणी सजवलेली घरं, ख्रिसमस ट्री, केक्स, पार्टी, प्रार्थना योजल्या जातात.
प्रत्येक चर्चसमोर गाईचा गोठा, त्यात जन्मलेला येशू बाळ, त्याची आई मेरी… आकाशात चमकणारा तारा, जमलेले लोक यांचं दृशरूप साकारलं जातं. काहीजण सांताक्लॉजचा वेश घेऊन घराघरात रस्त्यांवर भेटीची पोटली घेऊन हिंडतात. तसं पाहता सगळय़ा जगात ख्रिश्चन धर्मीय शांताताप्रिय व अत्यंत सहिष्णू तितकेच प्रेमळ. काwटुंबिक वाद, हिंसा यांपासून दूर… जेव्हा की त्यांच्या प्रेषिताला महाभयंकर शिक्षेला सामोरे जावे लागले, पण तरीही या समाजानं कधीच द्वेष पिंवा समाजविघातक कामं केली नाहीत. फादर पिंवा नन होणं ही तर कठोर साधनाच. कायम लोकांची सेवा हेच त्यांचं जीवित ध्येय. मदर टेरेसा हे आपल्या इथलं स्पष्ट उदाहरण.
नाताळची उत्सवभेट संपली की, लगेच नाक्यानाक्याला शहरात प्रमुख ठिकाणी म्हातारबाबा तयार होऊ लागतात आणि छोटं बाळही तयार होतं, अंगडं टोपडं घालून रांगणारं. मग 31 डिसेंबरच्या 12 वाजता मोठय़ा ढकलगाडीवर पिंवा टेम्पोमध्ये हे गवत भरलेले म्हातारबाबा न् नववर्षाचं रांगतं बाळ यांचीं वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशे, गाणी, नाच… आरडाओरडा, हसणं यानं परिसर दणाणून जातो… जगभरातली आकाश लखलखू लागतात आतषबाजीनं. वेगवेगळय़ा चित्राकृती झगमगू लागतात… अवकाशातल्या तारका पण चकित होत तोंडात चमचमतं बोट घालतात. चंद्र घाबरून ढगाआडच जातो. पाटर्य़ांचा जल्लोष, नाच गाणी. एकमेकांना शुभेच्छा. अनोळखी ओळखीचा हा फरक राहतच नाही…! सर्वांना केवढा आनंद झालेला असतो नव्या वर्षाच्या आगमनाचा! जेव्हा की कुणालाच माहीत नसतं नव्या वर्षाच्या हातात काय काय लपलंय. सांताक्लॉजच्या हातातल्या पोटलीत, रथातल्या पेटाऱयात जसं तो काय भेट देणार हे माहीत नसतं तसंच याही दिवसाच्या हातात काय काय आहे हे माहीत नसताना पण लोक खूश असतात. कदाचित माहीत नसतं म्हणूनच आपण सुखी आहोत असंही!
पुढलं वर्ष आपण असं असं घालवू… हे हे करूच अशी संकल्पना करतो, तर अनेक स्वप्नांना आपण जन्म देतो हे काय कमी आहे. भूतकाळ माहीत असतो… वर्तमानात जगत असतो आणि भविष्य आपण घडवणार असतो! तेव्हा आनंदी राहा, खूश राहा आणि नवीन वर्षाचं स्वागत हसून करा.
ख्रिसमसच्या, नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!
ऐका आवाज स्वप्नांचा, सांताचा,
ऐका आवाज स्वतःचाही… मनाचा विचारांचा…
ऐका आवाज आपल्या माणसांच्या नात्यांचा…
उत्सव साजरा करा जगण्याचा!
[email protected]






























































