
>> प्रसाद ताम्हनकर
2022 या सरत्या वर्षाने तंत्रज्ञानाच्या विश्वात अनेक घडामोडी पाहिल्या. कोरोनाच्या दणक्यातून जग सावरत असताना तंत्रज्ञान विश्वानेदेखील विविध शाखांमध्ये चांगली भरारी घेतली. कोरोनाकाळात आणि त्यानंतरदेखील AI (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवाची जी काही मदत केली त्याला तोड नाही. कोरोनाशी लढताना मानवी संपर्तका न येता रुग्णांना तपासण्यापासून ते वैद्यकीय सल्ले देण्यापर्यंत, कोरोना रोगावर इलाज शोधण्यात मदत करण्यापर्यंत प्रचंड मोठी मदत या AI तंत्रज्ञानामुळे मिळाली आणि पुढेही मिळत राहील.
ड्रोन तंत्रज्ञानातदेखील विविध बदल घडले. अधिक ताकदवान, वजनाने हलकी आणि अधिक कार्यक्षम अशी नव्या पिढीची ड्रोन बनवण्यात हिंदुस्थानसह अनेक देशांना यश मिळाले. VR (Virtual Reality) अर्थात आभासी जगाच्या तंत्रज्ञानातदेखील कमालीची सुधारणा घडली आहे. हे जग आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वास्तव भासायला लागले आहे. क्वांटम कॉम्पुटिंगच्या क्षेत्रातदेखील तंत्रज्ञान अधिक वेगवान आणि सुलभ होताना दिसत आहेत. या सर्व तंत्रज्ञानाबरोबर इतर काही नवे तंत्रज्ञानदेखील मानवाला खुणावते आहे आणि अधिक वेगाने जगाचा कब्जा घेते आहे. आज अशाच काही तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊ.
(RPA) Robotic Process Automation – अनेक उद्योगांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची संगणकीय कामे असतात जी रोज करावी लागतात. या कामांना प्रचंड वेळ लागतो, मानवी श्रम खर्ची पडतात आणि अनेकदा चुकादेखील घडतात. अशावेळी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (RPA) ही एक बिझनेस ऑटोमेशन टेक्नॉलॉजी किंवा ऑटोमेटेड सॉफ्टवेअर टूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा सॉफ्टवेअर रोबोट तयार करू शकता, जो तुमच्यासाठी हे काम सुलभपणे आणि वेगाने करू शकेल. हा सॉफ्टवेअर रोबोट कोणत्याही प्रकारची मॅन्युअल बिझनेस प्रोसेसही ऑटोमेट करण्यास सक्षम असतो. RPA चे मुख्य उद्दिष्ट हे व्यावसायिक प्रक्रिया आणि कार्ये मानवाकडून बॉट्सकडे हस्तांतरित करणे आहे, जेणेकरून कर्मचाऱयांवर कामाचा ताण कमी होईल आणि चुकांची संख्या नगण्य असेल.
Edge computing – एज कॉम्प्युटिंग हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे क्लाऊड कॉम्प्युटिंगचे विकसित रूप आहे. म्हणजेच एज कॉम्प्युटिंगच्या मदतीने कोणत्याही डेटावर (माहिती) प्रक्रिया करण्याबरोबरच रिअल टाइम डेटाची प्रक्रियाही वेगाने करता येते. एज कॉप्युटिंग सामान्यतः डेटाची प्रक्रिया जलद करते. कारण ते आधीच क्लाऊड कॉप्युटिंगमधील डेटावर प्रक्रिया करते आणि वापरकर्त्यांना डेटाची आवश्यकता असताना त्याच वेळी डेटाचे विश्लेषण करून रिअल टाइममध्ये डेटा प्रदान करते. Edge Computing चा फुल फॉर्म ‘‘Enhanced Data Rates For GSM Architecture’’ आहे. हे तंत्रज्ञान लोकल नेटवर्कच्या मदतीने डेटावर प्रक्रिया करत असल्याने ते क्लाऊड कॉम्प्युटिंगपेक्षा वेगाने काम करते.
Blockchain : सध्या प्रचंड चर्चेत असलेले तंत्रज्ञान त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हे तंत्रज्ञान वापरू शकणाऱया प्रशिक्षितांची संख्याही सध्यादेखील मोजकी आहे, मात्र या तंत्रज्ञानाचे फायदे व त्याची क्षमता लक्षात घेऊन अनेक अग्रगण्य संस्थांनी या तंत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. प्रचंड फायद्याचे असे हे तंत्रज्ञान असून त्याद्वारे वेळ, श्रम यांची प्रचंड बचत होणार असून अनेक चुकादेखील टाळता येणार आहेत. एखाद्या व्यवहाराच्या पूर्ण नोंदी एकाच ठिकाणी साठवण्याचे काम या तंत्रज्ञानाद्वारे करता येते. उदा. ः तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूच्या खरेदीदार आणि विव्रेत्याचे नाव, व्यवहाराची तारीख, रक्कम, त्यावर भरलेले टॅक्स, वस्तूची गॅरेंटी, वस्तूचा विमा अशा सर्व कागदपत्रांच्या नोंदी एकाच ठिकाणी ‘डिजिटल’ स्वरूपात होतात आणि या व्यवहाराशी संबंधित सर्व व्यक्तींना ती 24X7 उपलब्ध असते.
5 जी, 3 डी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा इतर तंत्रज्ञानाची देखील भरारी 2022 मध्ये बघायला मिळाली आहे. 5 जी तंत्रज्ञान सेवा आता काही मुख्य शहरांमध्ये सुरूदेखील झाली आहे आणि आपल्यापैकी काही जण सध्या तिचा लाभदेखील घेत आहेत आणि काही लवकरच घ्यायला लागणार आहेत.


























































