
नगर शहर व परिसरातील मांसविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून शहरात उघडय़ावर ऍनिमल वेस्ट न टाकण्याबाबत महापालिकेने हमीपत्र घेतले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील स्वच्छता निरीक्षकांनी संबंधित भागातील 180 दुकानांना भेटी देऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. रात्रीच्या वेळी उघडय़ावर ऍनिमल वेस्ट आणून टाकणाऱयांवर कारवाईसाठी महापालिका गस्ती पथक नियुक्त करणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांनी दिली.
शहर परिसरात ओढे-नाले व मोकळ्या जागांवर ऍनिमल वेस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर दुर्गंधी सुटली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला सर्वेक्षण करून कारवाईचे आदेश दिले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. शेडाळे यांनी स्वच्छता निरीक्षकांना सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तसेच, उघडय़ावर ऍनिमल वेस्ट न टाकण्याबाबत मांसविक्रेत्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार स्वच्छता निरीक्षकांनी मांसविक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेतले आहे.
झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय परिसरात सर्वाधिक 87 छोटे-मोठे मांसविक्रेते आहेत. त्यांच्याकडून उघडय़ावर कचरा न टाकण्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. तसेच, सावेडी प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील 47, बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील 29 व माळीवाडा प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील 17 अशा 180 विक्रेत्यांकडून हमीपत्र घेऊन ते महापालिकेत जमा करण्यात आले आहेत. या उपरही उघडय़ावर कचरा टाकणाऱयांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश आयुक्त जावळे यांनी दिले.
दरम्यान, नगर शहरात एकही कत्तलखाना अधिकृत नसल्याने बेकायदेशीर कत्तलखान्यांच्या ऍनिमल वेस्टचा प्रश्न कायम आहे. अशा बेकायदेशीर कत्तलखान्यांकडून उघडय़ावर टाकल्या जाणाऱया ‘ऍनिमल वेस्ट’संदर्भात कठोर महापालिका आयुक्तांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी लवकरच महापालिकेचे गस्ती पथक स्थापन करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी ऍनिमल वेस्ट रस्त्यावर टाकणाऱयांवर महापालिकेचे हे पथक कारवाई करणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापनप्रमुख शेडाळे यांनी सांगितले.
































































