
कानडी प्रशासनाच्या वाढत्या दडपशाहीविरोधात आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हजारो मराठीभाषिक कोल्हापुरात एकवटले. कोल्हापुरात प्रचंड रॅली काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में’, असा अटळ निर्धार करण्यात आला. आजपर्यंत मराठीभाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आहे. मात्र, कर्नाटककडून मराठीभाषिकांची गळचेपी सुरूच असून, त्यांना चपराक बसण्यासाठी एक दिवस ‘महाराष्ट्र बंद’ पुकारून मराठीभाषिकांना ताकद द्यावी, असे आवाहन सीमाबांधवांकडून करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
कानडी सक्तीकरणासह मराठी भाषिकांवर होत असलेली दडपशाही तसेच परवानगी रद्द करून मराठी भाषिकांचा महामेळावा चिरडणाऱया कर्नाटक सरकार आणि कानडी पोलिसांच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह सर्वपक्षीयांनी आज कोल्हापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. सकाळी बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून हजारो सीमाबांधव चारचाकी व दुचाकी वाहनांच्या रॅलीने कोल्हापूरकडे निघाले. पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोगनोळी टोलनाका येथे सीमाबांधवांच्या स्वागतासाठी थांबलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांना हटविण्याचा प्रयत्न कानडी पोलिसांनी केल्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. तरीसुद्धा सीमाबांधवांच्या हाती भगवा ध्वज देऊन स्वागत केल्यानंतर ही रॅली कोल्हापुरात दाखल झाली.
कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच ऐतिहासिक बिंदू चौक येथील महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली थांबविण्यात आली. या रॅलीतील मराठीभाषिकांसह जिह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिक असे हजारोजण ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करून कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, राष्ट्रवादीचे आर. के. पवार, काँगेसचे सचिन चव्हाण, कादर मलबारी आदी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणुका किल्लेकर, युवा समितीचे शुभम शेळके, श्रीकांत कदम, मदन बामणे, माजी उपमहापौर व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम, विजय सावंत, श्रीनाथ पाटील, प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, सुधीर चव्हाण यांच्यासह सीमाबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कानडी अत्याचाराचा पाढा
सुप्रीम कोर्टात 2004 साली याचिका दाखल करण्यात आल्यानंतरही कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठीभाषिकांवर अत्याचार सुरू आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोग तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतरही प्रशासनाकडून मातृभाषेतील अभिव्यक्तीचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जात आहे. मराठीभाषिक बहुसंख्य असले तरी प्रशासकांना फक्त कन्नड भाषेतच संवादाची सक्ती आहे. लोकसंख्या बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून, कन्नडभाषिकांना बेळगावच्या मध्यभागी स्थायिक केले जात आहे. नाव बदलून कन्नड संस्कृती लादण्याचे धर्मांध पाऊल उचलले गेले. बेळगावचे ‘बेळगावी’, वडगावचे ‘वडगावी’ केले. आता मराठीभाषिकांची 1 हजार 500 एकर सुपीक जमीन संपादित करून, रिंग रोड आणि बायपास करण्यात येत आहे. राज्याच्या सीमा पुनर्रचनेच्या विकसित तत्त्वांचे पालन व मध्यस्थी करून वाद सोडवावा. राज्याच्या सीमा, भौगोलिक संलग्नता, भाषिक बहुसंख्य आणि येथे राहणाऱया लोकांच्या इच्छेनुसार विवादित क्षेत्राचा वाद सोडवावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना करण्यात आली आहे.
महाराष्ट्राने सीमाबांधवांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे
महाराष्ट्र सीमाप्रश्नी मराठीभाषिकांच्या पाठीशी नेहमीच ठाम उभा राहिला आहे. तरीसुद्धा कन्नड
सक्तीसह मराठी शाळा बंद करण्यापासून कानडी प्रशासनाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मराठीभाषिकांच्या पाठीशी असल्याचे कर्नाटक सरकार आणि ‘कन्नड रक्षण वेदिके’ला कृतीतून ठणकावून सांगण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी एक दिवस ‘महाराष्ट्र बंद’ करून पाठिंबा द्यावा, अशी भावना मराठीभाषिकांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र कायमच सीमाबांधवांच्या पाठिशी उभा राहील, अशी
ग्वाही सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आली.



























































