
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर 13 महिने आणि 27 दिवसांनंतर बुधवारी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. कथित आर्थिक अफरातफर आणि 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडी व सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी देशमुख यांना अटक केली होती. तथापि, दोन्ही प्रकरणांत मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करीत देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. देशमुख हे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुरुंगातून बाहेर येताच तेथे जमलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
ईडीच्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख हे सीबीआयच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. 12 डिसेंबरला सीबीआयच्या गुह्यातही उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी देशमुख यांना जामीन मंजूर केला. याचवेळी न्यायालयाने सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सुरुवातीला 10 दिवस आणि नंतर 7 दिवस अशाप्रकारे एकूण 17 दिवसांचा अवधी दिला होता. तथापि, या अवधीत अपिलावर तातडीची सुनावणी करून घेण्यात सीबीआय अपयशी ठरली. यानंतरही सीबीआयने आणखी मुदतवाढ मागत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र जामिनाला आणखी स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार बुधवारी दुपारी सत्र न्यायालयात हमीदार हजर करीत जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास देशमुख हे आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यावेळी देशमुख यांचे जल्लोषात स्वागत झाले.
न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास – देशमुख
माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला खोटय़ा आरोपात गोवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या 100 कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमबीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगासमोर जाऊन प्रतिज्ञापत्र दिले. मी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचे जे आरोप केले, ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही, असे परमबीरने सांगितले. माझ्या 35 वर्षांहून अधिक कालावधीच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप झालेला नाही. मात्र केवळ दोन पोलीस अधिकाऱयांच्या तथ्यहीन आरोपांमुळे मला वर्षभराहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. त्या पोलिसांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सत्य लोकांसमोर येईल – अजित पवार
आज आम्हाला सगळय़ांना आनंद झालेला आहे. आमचे एक सहकारी तुरुंगात होते. लोकशाही असो की संविधान असो, आरोप झाल्यानंतर कोर्टात दाद मागितली जाते. अनिल देशमुख आज बाहेर आलेले आहेत. आता कोर्टाने अनिल देशमुख यांच्यासंदर्भात काय निर्णय दिला आहे ते सगळे पाहतील. हे कशा पद्धतीने घडले हे सत्य जनतेसमोर येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
109 वेळा छापे हा जागतिक विक्रम – सुप्रिया सुळे
केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातल्या ईडी सरकारविरोधात कोणी काही बोलले तर त्याला आधी केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते, त्यांना खोटय़ा गुह्यात अडकवण्यात येते. भुजबळ, राऊत आता देशमुखांची केसही आपण पाहिली. अनिल देशमुखांविरोधात ईडीने 109 वेळा छापे टाकले, पण एकदाही हाती काही आले नाही. हा जागतिक विक्रम आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
माझ्या 35 वर्षांहून अधिक कालावधीच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप झालेला नाही. मात्र केवळ दोन पोलीस अधिकाऱयांच्या तथ्यहीन आरोपांमुळे मला वर्षभराहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. त्या पोलिसांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.
– अनिल देशमुख
अनिल देशमुख यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. आर्थर रोड कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. देशमुख बाहेर येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर देशमुख यांची जंगी मिरवणूक निघाली. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे हे यावेळी उपस्थित होते.
आरती देशमुख यांना अश्रू अनावर
अनिल देशमुख यांच्या सुटकेवेळी देशमुख कुटुंबीय कारागृहाबाहेर हजर होते. अनिल देशमुख आणि त्यांची पत्नी आरती देशमुख यांची भेट झाली तो क्षण भावुक करणारा होता. अनिल देशमुख यांना पाहून आरती यांना हुंदका आवरता आला नाही. त्यांना बिलगून त्या रडल्या. त्यावेळी देशमुख यांच्या डोळय़ांतही अश्रू तरळले.
अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आर्थर रोड कारागृहापासून बाइक रॅली काढली. ‘न डरे हम, न झुके हम’ हे पोस्टर यावेळी लक्षवेधी ठरले. ही रॅली सिद्धिविनायक मंदिराजवळ गेली तेव्हा देशमुख यांनी मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत
अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच आर्थर रोड तुरुंग परिसरात मोठी गर्दी केली होती. देशमुख हे तुरुंगाच्या गेटमधून बाहेर येताच त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुरू करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पेढय़ांचे वाटप करीत देशमुख यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच ‘देशमुख साहेब झिंदाबाद’, ‘देशमुख साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर हात उंचावून देशमुख यांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.
अनिल देशमुख हे तुरुंगाबाहेर येताच त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी आर्थर रोड तुरुंग परिसरात हजेरी लावली होती. या नेत्यांमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश होता. हे नेते देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत होते. सुटकेनंतर देशमुख यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.




























































