नागरदेवळे नगरपरिषद बरखास्तीचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवा; संभाजीनगर खंडपीठाचा आदेश, 13 जानेवारीला पुढील सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या 3 गावांची मिळून नागरदेवळे नगरपरिषद स्थापन करण्याबाबत काढलेली अधिसूचना शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली. या निर्णयाला ग्रामस्थांनी संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने नागरदेवळे नगरपरिषद बरखास्तीचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ऍड. कश्यप तरकसे यांनी दिली.

याप्रकरणी निखिल शेलार यांनी याचिका दाखल केली होती. नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या 3 गावांची मिळून नागरदेवळे नगरपरिषद स्थापण्याचा निर्णय तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला होता. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र, सरकार बदलताच नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही अधिसूचना रद्द केली. या निर्णयाविरोधात निखिल शेलार, सुशील कदम, योगेश धाडगे, ज्ञानेश्वर धोत्रे, गाडेकर आदींनी ऍड. कश्यप तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. नंदिनी चित्तल यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 22 डिसेंबरला खंडपीठातील न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांकडून शासनाकडून पारित करण्यात आलेला नागरदेवळे नगरपरिषद बरखास्तीचा आदेश हा बेकायदा असल्याचे सांगण्यात आले.

नगरपरिषद करताना सर्व नियमानुसार प्रक्रिया झालेली आहे. मात्र, निर्णय रद्द करताना तसे काही झालेले नाही. शासनाच्या या आदेशामुळे नागरिकांचे हाल होत असून, भविष्यात मिळणाऱया मूलभूत सुविधांना त्यांना मुकावे लागेल. त्यामुळे शासनाने नगरपरिषद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा व नगरपरिषद कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्ते व शासनाचे प्रतिनिधी यांचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने 13 जानेवारी 2023 पर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी 13 जानेवारीला होणार आहे.

गटविकास अधिकाऱयांनी मागितले वकिलांकडे मार्गदर्शन

नागरदेवळे नगरपरिषदेची अधिसूचना नवीन सरकारने रद्द केल्यानंतर या तिन्ही गावांत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने तिन्ही गावांत ग्रामपंचायत घोषित करत या तिन्ही गावांवर प्रशासक नेमला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती केलेली आहे. खंडपीठाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही गट विकास अधिकाऱयांना पत्र देत खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाच्या आदेशाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने याबाबत गटविकास अधिकाऱयांनी या प्रकरणात नेमलेले पॅनेलवरील ऍड. विनायक नरवडे यांच्याकडून मार्गदर्शन मागविले आहे.