
घटनात्मक पदावरील व्यक्तीने संशय निर्माण होईल असे वागू नये. आमचं ऐकूनच घेतलं जात नाही. हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यानुसार मी अध्यक्षांकडे हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी वेळ मागत होतो. मी सातत्याने ओरडत होतो. पण, माझी हरकत ऐकून घेतली जात नव्हती. आपल्या कामाबद्दल, आपल्या निर्णयाबद्दल, आपल्या कृतीबद्दल संशय निर्माण होईल एवढं चुकीचं वागू नये, असे म्हणत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला.
भाजपमध्ये आलेले लोक तुमची विचारधारा बघून पक्षात आले नाहीत. त्यांच्या पाठी केंद्रीय संस्था लावल्या म्हणून ते भाजपमध्ये आले. त्यामुळे सुडाचे राजकारण करू नका असेही भास्कर जाधव यांनी सांगितलं.
अफजल खानाचा मुद्दा उचलून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. पण तस झालं नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून वातावरण बिघडवण्याचं काम भाजप करणार म्हणत अफजल खान यांच्या कबरीच्या विषयाला धरून माध्यमासमोर खुलासा केला. मला अफजल खानावर प्रेम नाही. तेथील अतिक्रमण काढलं याचा आनंद आहे. माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धार्मिक मुद्दे उपस्थित करून भाजप वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला.
राहुल शेवाळे यांची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 2014 पासून केंद्रात सरकार आले असताना नवाब मलिक दाऊदचे हस्तक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही का? ज्या महिलेशी माझे संबंध जोडले जात आहे, ती दाऊदशी संबंधित आहे. असे राहुल शेवाळे म्हणतात. मग त्यांनी त्या महिलेला पैसे का दिले? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.





























































