ललित – सुरमणी कमलाकरराव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

साल एकोणीसशे ब्याऐंशी. मी त्यावेळी शरद देऊळगावकरांच्या घरात भाडय़ाने राहात होतो. त्यावेळी शेजारी असणाऱया घरातून संगीताचे सुर ऐकू यायचे. पहाटेच्या वेळी प्रसन्न वाटायचे आणि संध्याकाळच्या कातरवेळी ते सूर अस्वस्थ तरीही आश्वस्त करून जायचे. चौकशी केली तर कळले की, तिथे कुणी कमलाकरराव परळीकर राहतात. ते संगीत शिकवतात. मला पहिल्यापासून थोडे गाण्याचे वेड असल्यामुळे मी आपोआपच तिकडे ओढला गेलो. बुजऱया स्वभावामुळे एकटे जाण्याची हिंमत झाली नाही म्हणून मी माझा स्टेट बॅंकेतला उत्तम गाणारा मित्र उत्तम त्रिनगरे याला घेऊन परळीकरांच्या क्लासमध्ये पाऊल टाकले. तसे आम्ही दोघेही प्रथम टरकलोच होतो, पण स्वतः गुरुजी सामोरे आले आणि आम्ही थोडे सावरलो म्हणायला हरकत नसावी. त्यांनी आपुलकीने चौकशी केली, ‘‘आम्ही शिकवणुकीसाठी आलो आहोत.’’ तेव्हा ते सौम्य हसले. ‘‘एखादे गाणे म्हणा, कोणतेही!’’ उत्तम काय आणि मी काय हिंदी गाण्यात रंगलेले! मला आठवते, उत्तमने तलतचे एक गाणे म्हटले. आजही मला ते गाणे स्मरणात आहे, ‘जिंदगी देने वाले सून’… खुद्द तलतच्या आवाजापेक्षाही मला त्याच्या आवाजातले गाणे भावले होते. नंतर माझी पाळी आली. मी कसेबसे ‘अजहून आये बालमा’ हे क्लासिकल गाणे त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी निवडले होते. आम्ही गात असताना सर गालातल्या गालात हसत होते. मी आणि उत्तम नर्व्हस होऊन गेलो होतो. आमचे चेहरे पाहून सर हसत हसत म्हणाले, ‘‘अरे, चेहरे काय पाडताहात, तुम्हा दोघांचेही स्वर खूप चांगले आहेत! थोडीशी डागडुजी करावी लागेल! त्यासाठी मी आहे ना!’’ खूप समाधान मिळाले. आमची शिकवणी सुरू झाली. आम्ही दोघेही ‘वाया गेलेले’ या सदराखाली येणारे असल्यामुळे दुर्दैवाने आमचे सातत्य राहिले नाही. बँकेच्या अनियमित वेळा, आणि आमचे ‘आवारा’पण आड येत गेले. त्यामुळे सरांपासून देहाने दूर गेलो असलो तरी मनाने आम्ही त्यांच्यापाशीच घुटमळत राहिलो, ते आजपर्यंत!

कपाळावरून उलटे फिरवलेले मानेवर रुळणारे कुरळे केस, सावळ्या चेहऱ्यावरचे स्निग्ध स्मित, उंच बांधा, गुडघ्याखाली पोहोचणारा नक्षीदार कुर्ता, खांद्यावर कायम एक शबनम लटकलेली, पायात साधी चप्पल! हा साधासुधा माणूस ‘तपस्वी’ वाटायचा. इतके शांत व्यक्तिमत्त्व मी क्वचितच पाहिले असेल. त्यांचे सूर मला कायमचे ऋणी करून गेले आहेत. मी अनेक गायक-गायिकांची गाणी ऐकली, पण सरांच्या आवाजातले आकर्षण वेगळेच! त्यांच्या आवाजातली नजाकत मला प्रयत्न करूनसुद्धा कुठे आढळली नाही. एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्यांनी कार्यक्रम ठेवला होता. सगळ्यांनी मन लावून गाणी गायली. शेवटी सरानी ‘‘विलोपिले रे मधुमीलनात या’ हे गाणे छेडले तेव्हा मदहोश होणे म्हणजे काय असते ते मी अनुभवले. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे त्यांच्या तोंडूनच ऐकावे. मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझे अश्रू अनावर झाल्याचे आठवते. त्यानंतर जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकत आलो तेव्हा तेव्हा मला सरांची आठवण आली नाही असे कधीच झाले नाही. त्यांचा ख्याल, रागदारी हे सगळे ‘उत्कट’ या सदराखाली येते. मी शास्त्रीय संगीतातला अडाणी ठोकळा असलो तरी थोडाफार ‘कान’ तयार आहे. अर्थातच याचे श्रेय बरेचसे सरांकडे जाते. त्यांच्याकडची माझी ‘शिकवणी पूर्णत्वाला गेली नसली तरी माझ्या तथाकथित गायनाची पार्श्वभूमी त्यांनीच तयार केली हे मी विनम्रपणे कबूल करतो. न राहवून मी कधीमधी एखादी ‘चीज’ छेडतो तेव्हा त्यात आपल्या भावना कशा ओतायच्या हे सरांनी न शिकवताही मी शिकू शकलो. सुरुवातीला मालपंस, भूप या रागातल्या चिजा त्यांनी शिकवल्या तेव्हा त्या माझ्या मनात इतक्या कोरल्या गेल्या होत्या की, त्या आजही गुणगुणताना मी तीस-पस्तीस वर्षे मागे फेकला जातो!

मला राहून राहून वाटते की, अलौकिक सुरांचा वारसा लाभलेल्या या महान गायकाचा यथोचित सन्मान व्हायला हवा होता. त्यांना ‘सुरमणी’ पद मिळाले, संगीतातले उच्च स्थानही मिळाले, पण तरीही त्यांच्या सुरांचा सर्वदूर प्रसार जसा व्हायला हवा होता तसा होऊ शकला नाही याची खंत वाटते. इतका गुणी कलावंत महाराष्ट्राच्या विस्तीर्ण पटलावर थोडासा दुर्लक्षित राहिला याचे वाईट वाटते.

मी त्यांचा अल्पकालीन विद्यार्थी, कदाचित मी त्यांच्या स्मरणातही नसेन, पण ते माझ्या अंतरंगात इतके पाझरले आहेत की, माझ्या सभोवताली नांदणाऱ्या सुरांमध्ये ते नेहमीच मला भेटून जात असतात हे मात्र खरं!
[email protected]