लेन्स आय – काझीरंगा म्हणजे रंगांची उधळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋता कळमणकर

जागतिक वारसा स्थानात ज्याचा समावेश होतो असे आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंडय़ासाठी तर प्रसिद्ध आहेच, त्याचप्रमाणे पाणम्हशी येथे मोठय़ा संख्येने आहेत. तसेच दुर्मिळ बारासिंगा, हत्ती, हॉग डिअर आणि विविध स्थलांतरित पक्ष्यांसाठी ते अग्रणी आहे.

दुर्मिळ महाकाय एकशिंगी गेंडा हे इथले प्रमुख आकर्षण म्हणता येईल. काझीरंगाच्या विस्तीर्ण गवताळ कुराणात पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात हत्तीवरून केलेल्या सफारीत धुक्याच्या आवरणात गवत खाणारे गेंडे अगदी जवळून पाहायला मिळतात. बागडणारी हॉग हरणे, रंगीबेरंगी जंगल फाऊल यांची मनसोक्त पह्टोग्राफी करता येते. अतिशय जाड कातडी असलेले हे गेंडे साधारण 1600 किलो – 2000 किलो वजनाचे असतात. कातडी आणि शिंगासाठी त्यांची मोठय़ा प्रमाणात शिकार होते.

त्याचप्रमाणे नारंगी, पिवळसर चोच, माथ्यावर ठळक दोन काळे पट्टे आणि पिवळे पाय असणारा बार हेडेड गूस (राजहंस) हे पक्षी युरोप आणि आशियावरून हिंदुस्थानात येतात. सर्वाधिक उंचीवरून अगदी हिमालयावरूनही हे उडत येतात अशी नोंद आहे. हे आपल्याला काझीरंगामध्ये मोठय़ा संख्येत पाहायला मिळतात. कमळाची देठे, अळंबी, बिसतंतू हे त्यांचे खाद्य आहे. राजहंसाचा थवा निळ्याभोर आकाशात उडताना पाहून मन मोहून टाकतो. तसेच विविध प्रकारच्या घारी, शिकारी पक्षी, बदके, पोपट, गिधाडे, हॉर्नबिल हे काझीरंगातील आकर्षण आहे. एका अर्थाने हा पक्षीप्रेमींचा स्वर्गच म्हटला पाहिजे.

काझीरंगापासून साधारण 3 तासांच्या अंतरावर गिब्बन वाइल्ड लाइफ सँक्चुरीला आवर्जून भेट द्यावी. नामशेष होत जाणारा गिब्बन एकमेव भारतीय ape आपल्याला येथे पाहावयास मिळतो, झाडाच्या अगदी वरच्या टोकावर राहून आपल्या लांबलचक हातांच्या साहाय्याने या झाडावरून त्या झाडावर तो लीलया जातो. नर हा काळा व ठळक पांढऱया भुवयांच्या असतो तर मादी फिकट तपकिरी असते. मध्यम आकाराचा हा प्राणी झाडांच्या फळांवर गुजराण करतो.

काझीरंगा आणि गिब्बन हे अतिशय दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांचे आश्रयस्थानच आहे. एकशिंगी गेंडय़ांची कातडी आणि शिंगांसाठी होणारी शिकार तसेच ब्रह्मपुत्रेला येणारा पूर या येथील समस्या आहेत; परंतु स्वछ सूर्यप्रकाशात विस्तीर्ण गवतात दिसणाऱया रानटी म्हशी, गेंडे, क्वचित दिसणारा वाघ, असंख्य पक्षी, जंगलाच्या पायवाटेवर पडलेला लालबुंद फुलांचा सडा, गवताच्या विविध शेड डोळ्यांचे पारणे फेडतात. काझीरंगा म्हणजे रंगांची नुसती उधळण.
[email protected]