धर्मराज काडादी यांचा बंदूक परवाना रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानसेवेसाठी उपोषणास बसलेले सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी बंदूक दाखवली होती. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या बंदुकीचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

विमानसेकेला अडथळा ठरणारी कारखान्याची चिमणी काढावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात येत होते. काही दिवसांपूर्की या आंदोलनस्थळी जाऊन काडादी यांनी शहा यांना बंदूक दाखविली. याबाबतचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी काडादी यांना नोटीस बजावली होती. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका केतन शहा यांनी घेतली होती. पोलिसांनी दोघांनाही नोटीस देत खुलासा मागविला होता.

बंदूक दाखवल्याप्रकरणी काडादी यांनी दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याचे कारण देत त्यांचा बंदुकीचा परवाना मार्चअखेरीपर्यंत निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार धर्मराज काडादी यांनी आपले पिस्तूल पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.