
शिवशक्ती-धुळे, डॉ. शिरोडकर, विश्वशांती, स्वामी समर्थ यांनी बंडय़ा मारुती सेवा मंडळ आयोजित ‘आमदार चषक’ कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी दिली. मात्र पहिल्याच दिवशी ठाण्याच्या महिला संघांच्या पदरी अपयश पडले. पुरुषांत जयभारत, गुड मार्ंनग, गोल्फादेवी, स्वस्तिक, सत्यम सेवा, मिड-लाईट, विजय क्लब, शिवशंकर यांनी साखळीत विजयाने प्रारंभ केला.
श्रमिक जिमखाना येथे सुरू झालेल्या महिलांच्या ‘क’ गटात धुळ्याच्या शिवशक्तीने ठाण्याच्या माऊली प्रतिष्ठानचा 38-30 असा पराभव करीत या उद्घाटनीय सामन्यात विजयी सलामी दिली. ऋतुजा बांदिवडेकर, राणी गुप्ता यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने विश्रांतीला 27-13 अशी आघाडी घेणाऱया शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत हा विजय साकारला.
महिलांच्या ‘ब’ गटात डॉ. शिरोडकरने मेघा कदम, क्षितिज हिरवे यांच्या धारदार चढाया, नेहा कदमच्या भक्कम बचावाच्या बळावर 38-20 असे नमवित पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या डावात 21-10 अशी शिरोडकरकडे आघाडी होती. होतकरूच्या प्राजक्ता पुजारी, वेदिका बावेकर बऱया खेळल्या. ‘अ’ गटात विश्वशांतीने ठाण्याच्या ज्ञानशक्तीचा 34-29 असा पाडाव केला.
श्री स्वामी समर्थने ‘ड’ गटात अमरहिंदवर 32-16 अशी सहज मात केली. पुरुषांच्या ‘ब’ गटात चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात जय भारतने पूर्वार्धातील 11-16 अशा 5 गुणांच्या पिछाडीवरून उपनगरच्या अंबिकाचा प्रतिकार 34-25 असा मोडून काढला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी नगर येथे झालेल्या 70 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सुवर्ण चढाईत 16 वर्षांनंतर विजयी ठरलेल्या मुंबई शहर संघाचा संघनायक संकेत सावंतचा सत्कार केला.
पुरुष विभागाचे इतर निकाल संक्षिप्त
अ गट – विजय क्लब वि. वि.. विजय नवनाथ (47-16).
ग गट – शिवशंकर मंडळ वि. वि. नवोदित (46-31).
स्वस्तिक वि. वि. अमर क्रीडा (37-28).




























































