
दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये डोसा हा बहुतेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे, मात्र तंतोतंत दाक्षिणात्य पद्धतीचा डोसा प्रत्येक घरात बनवता येत असेल, हे सांगता येत नाही, कारण बऱ्याचदा तो तव्याला चिकटतो. त्यातील प्रमाण व्यवस्थित नसेल, तर डोश्याची पूर्ण रेसिपीच बिघडून जाते. काही वेळा तो पातळ होतो. काही वेळा तो जाड होतो. अशा एक ना अनेक तक्रारी सांगता येतील, पण आता तक्रारींमुळे डोसा करायला ज्यांना नकोसे वाटते, त्यांच्यासाठी आता सोपी पद्धत बाजारात आली आहे. जिचा वापर करून डोसा बनवणे आता अतिशय सोपे झाले आहे.
सोशल मिडियावर हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे खाण्यापिण्याच्या वस्तूही व्हायरल होत असतात. यामुळे दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तूंबद्दल माहिती मिळते. येत्या काही दिवसांत सोशल मिडियावर डोसा प्रिंटर या मशीनला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. याचे कारण म्हणजे हे साधारण पेपर प्रिंट करणारे मशीन नसून या मशीनमधून चक्क डोसा तयार होऊनच बाहेर येतो, शिवाय तोही अगदी पातळ आणि अतिशय क्रिस्पी !
बंगळुरू येथील एका कंपनीने सर्वप्रथम डोसा प्रिंटर नावाचे मशीन बाजारात आणले. वेगवेगळ्या प्रकारची डोसा प्रिंटर मशीन बाजारात उपलब्ध आहेत. या मशिनचे विविध व्हिडियोही सोशल मिडियावर ग्राहकांना बघायला मिळू शकतात. या मशिनची किंमत 15 ते 16 हजार रुपये एवढी आहे. या मशीनमध्ये प्लेन डोसा, मसाला डोसा, प्लेन उत्तप्पा असे विविध पदार्थ तयार करता येऊ शकतात.
डोसा प्रिंटर कसे काम करते ?
तव्यावर डोसा बनवणे प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही, कारण याकरिता तव्याचे तापमान आणि डोशाचे पीठ (बॅटर) परफेक्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा बॅटर परफेक्ट असले, तरीही डोसा पातळ किंवा जाड होऊ शकतो किंवा तव्याला पीठ चिकटून राहते. याऐवजी डोसा प्रिंटर मशीनचा वापर केला तर अगदी आपल्याला हवा तसा, बाजारात विकत मिळणाऱ्या डोशाप्रमाणे डोसा तयार करता येईल. यासाठी डोसा प्रिंटर मशीनच्या साच्यात डोशाचे पीठ घालावे. त्यानंतर प्रिंटर मशीन प्रीहिट करावे. मशीन प्रीहिट झाल्यानंतर डोसा तुम्हाला पातळ हवा आहे की जाड याची निवड करू शकता. त्यानंतर तुम्हाला डोसा किती कुरकुरीत हवा आहे, त्यानुसार वेळदेखील सेट करू शकता. साच्यात डोशाचे पीठ घातल्यानंतर ते आपोआप मशीनमध्ये पसरेल. या डोशाला ब्रशने थोडेसे तेल लावले की, डोसा झाला तयार.































































