आरोग्य – पुरेशी झोप घेण्याचा करूया संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षाच्या स्वागताबरोबरच नवीन संकल्पही केला जातो. निरोगी आहार, व्यायाम, वजन कमी करणे, चांगले आरोग्य राखणे अशा या संकल्पाच्या यादीत ‘दररोज पुरेशी झोप घेणे’ हा संकल्प करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला पाहिजे.

उत्तम झोप ही वजन, रक्तदाब, रक्तशर्करा, मेंदूचे आरोग्य एपंदरीत संपूर्ण आरोग्याशी निगडित आहे. या वर्षी जूनमध्ये, अमेरिकन हार्ट असोसिएशनने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना दूर ठेवण्यासाठीच्या चांगल्या आरोग्याच्या सवयींच्या यादीमध्ये पुरेशी झोप हा महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते असे नाही, तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीदेखील पुरेशा झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने नैराश्य आणि पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यतादेखील कमी होते.

झोपेचे प्रमाण व्यक्तीपरत्वे अवलंबून असते

प्रत्येकाला आठ तासांची गरज असते असे नाही, तर झोपेचे गणित हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रौढांना सहसा सात ते नऊ तासांच्या झोपेची आवश्यकता असते, तर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना त्याहूनही जास्त झोपेची आवश्यकता असते. अवेळी झोप घेणे, फार वेळ झोपणे व कमी वेळ झोपणे या तीनही गोष्टी शरीराचे आरोग्य बिघडवतात.
सुट्टीच्या वेळी जास्त तास झोपून आठवडय़ाभराची झोपेची कमतरता भरून निघत नाही. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पुरेशी झोप घेणे शक्य होत नाही. मग अशा वेळी सुट्टीच्या दिवशी भरपूर झोप घेतली, तर आठवडय़ाभराचे झोपेचे गणित सुरळीत केले जाऊ शकत नाही. रविवारी जास्तीचे दोन तास झोपण्यापेक्षा, आठवडय़ातून प्रत्येक दिवशी 15 मिनिटे अधिक झोप घेणे उत्तम राहील.

पुरेशा झोपेचे महत्त्व

तुम्ही पुरेशी झोप घेतल्यास दुसऱया दिवशी एक चांगला उत्साह निर्माण होऊन काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते. रात्रीच्या झोपेने आरोग्याच्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात. त्याकरिता दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक ठरते. अलीकडेच जगभरातील अनेक कार्डियोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार झोपेची कमतरता ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटकांशी जोडली गेली असून अपुऱया झोपेने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे येत्या नवीन वर्षात प्रत्येकाने पुरेशी झोप घेण्याचा संकल्प करावा.

 डॉ. अनुप महाजनी
(लेखक नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत)