
मलिका अमरशेख << [email protected] >>
नव्या वर्षात खूप छान चांगल्या कल्पना आपल्या डोक्यात येतात आणि संध्याकाळच्या सूर्यास्ताबरोबर अस्तदेखील पावतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवा जन्म, नव्या कल्पना, नवी लढाई, नवे प्रश्न, आयुष्याचे नवनवे अर्थ समजतात. माणसंही नव्याने समजतात. आपल्याला सगळंच कळतं इथपासून ते आपल्याला काहीच कळत नाही या अमोघ साक्षात्कारापर्यंत. ही बेरीज-वजाबाकी कायम सुरूच राहते.
नव्या वर्षाचे संकल्प, एकही संकल्प ठरवायचा नाही हाच संकल्प!
कारण इतक्या वर्षातला एकही संकल्प सिद्धीस गेलेला नाही. दोन वर्षांपूर्वीचा संकल्प होता पर्यटन. विविध समुद्रकिनारे, जंगले, अभयारण्य, गडकिल्ले हे बघायचा संकल्प जाहीर केल्याबरोबर कोरोना विमान पकडून इथे आला आणि मग घरात राहण्याचा भीषण संकल्प मान्य करावा लागला. त्याआधी या वर्षी काटकसर करून एक चांगली बाईक घ्यायचा संकल्प केल्याबरोबर जवळच्या नातलगांनी लगेच लग्न, बारसे याचा धुमधडाका सुरू केला. बाईक सोडाच, सायकल घेण्याइतकेसुद्धा पैसे वाचले नाहीत.
लहानपणी ‘मोठेपणी तू कोण होणार?’ या हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर माझं दरवर्षी वेगळं असायचं. अगदी लहानपणी मला आइस्क्रीमवाला व्हायचं होतं, दुसऱ्या वर्षी मोटरमन, तिसऱ्या वर्षी मला जोकर व्हायचं होतं. नंतर मग फिल्ममध्ये जायचं होतं. अशा पद्धतीनं माझे ध्येयाचे संकल्प पण वेगाने बदलत होते.
संकल्प व हिशोब न करता जगलेलं आयुष्य जास्त चित्तथरारक आणि सोपं असतं असं लक्षात आलं. भल्याभल्यांची आयुष्याची गणितं चुकलेली पाहिली आणि मग आपण ठरवलेलं काहीच होत नाही. मग मुळी ठरवायचं कशाला? असा निश्चय केला.
महाभारत आणि रामायणच घ्या. सगळे देवदत्त अवतार असून युद्ध त्यांना टाळता आलं नाही. मग आपण तर नश्वर, मर्त्य. आयुष्यातल्या लढाया, संकट कसे टाळणार?
9.35 च्या बडा फास्टमध्ये घुसायचं म्हटलं म्हणजे ‘पेरूचा पापा’ (पेन, रुमाल, चाव्या, पाकीट, पास) बंदोबस्तात ठेवावा लागतो आणि मग ‘हर हर महादेव’ अशी गर्जना न करताही तितक्याच चेवानं, आवेशानं तुंबळ गर्दीत घुसायचं. कुणाचं कोपर, कुणाचा पाय, कुणाचं डोपं… शरीराच्या इतक्या ठिकाणी प्रहार होतात की आपण सहिसलामत बाहेर पडल्यावर सर्वांग चाचपून आपण वनपिस आहोत ना हे पाहून निःश्वास सोडायचा! बाहेर आल्यावर कार चालवणारा पिंवा आत बसलेल्यांकडे हेवा, असूयेनं बघायचं आणि दुसऱ्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किमतीचे विजेच्या वेगाने वाढणारे दर पाहून आपल्याकडे कार नाही हे बरंच झालं असं वाटून हायसं वाटणं हेच आपलं सुख.
रोज सकाळी पेपर उघडला की बातम्या वाचून पूर्ण झाल्या की आपण सर्वात जास्त सुखी आहोत याबद्दल खात्री पटते. पॅन्सर, कोरोना, युद्ध, पाणी संकट, अग्नी संकट, बलात्कार, अपघाती मृत्यू, आत्महत्या, खून, पन्नास तुकडे शरीराचे… इ. भयंकर बातम्या वाचून यातला एकही प्रकार आपल्या बाबतीत झालेला नसून आपण सुखरूप जिवंत असून चहा पित आहोत घरात बसून यापरते भाग्य नाही असंच वाटत राहतं.
जग बदलायला हवं. जंगल वाढायला हवीत. पाणी वाचवायला हवं. व्यवस्था चांगली व्हायला हवी. प्रदूषण नष्ट करायला हवं. जैविक साधनसंपत्ती जपायला हवी आदी महान महान विचार मनात येतात आणि इतके चांगले महान विचार मनात आल्यानेच छान वाटू लागतं. त्यासाठी जे काय त्याग, धडपड, कष्ट करावे लागतात त्यासाठी इतर खूप चांगली माणसं जगात आहेत. त्यामुळे विचार करण्यातच दिवस संपतात, महिने आणि वर्षही संपतं.
मग वाटतं, आता आपण काय मागची पिढी. पुढच्या पिढीसाठी हे कार्य ठेवावं. हल्लीची पिढी खूप हुशार असं प्रत्येक पिढीतले लोक म्हणतात. प्रत्येक पिढीत काही अतिहुशार निपजतातच की! उत्क्रांतीवाद उगाच आहे का? माकडाचा माणूस झालाच की! पण माणसाचा माकड नाही होत. (काही अपवादात्मक घटना – लग्नासारखी सोडून) तर नव्या वर्षात खूप छान चांगल्या कल्पना डोक्यात येतात आणि संध्याकाळच्या सूर्यास्ताबरोबर अस्तदेखील पावतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवा जन्म, नव्या कल्पना, नवी लढाई, नवे प्रश्न, आयुष्याचे नवनवे अर्थ समजतात. माणसंही नव्याने समजतात. आपल्याला सगळंच कळतं इथपासून ते आपल्याला काहीच कळत नाही या अमोघ साक्षात्कारापर्यंत.
आपण आजवर नुसतेच जगलो की काही क्षण दुसऱ्यांचे हिरवेही केलेत का? आपल्यातलं काय हरवलं न् ते परत कधीच मिळणार नाही की आपण खुद्द हरवलो आहोत इथपासून ते नेमपं जिवंत असणं म्हणजे काय? या अर्थापर्यंत.
जीवनाचा प्रवास हा 9.35 च्या बडा फास्ट लोकलसारखाच झाला आहे. काहीजणांना खिडकीची सीट मिळते. काहींना दारावर लोंबकळत प्रवास करावा लागतो. काहीचा हात सुटतो तर काही चुकीच्याच गाडीत बसतात आणि भलत्याच स्टेशनात उतरतात. शेवटचं स्टेशन मात्र सगळय़ाचं एकच असतं न् तिथं कुणालाच जायचं नसतं, एवढं मात्र खरं!

























































