परीक्षण – गझल उत्तम खयालाताची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुधाकर वसईकर

भूक! मग ती कोणतीही असो, प्रेमाची, वात्सल्याची, वाचनाची असो वा कसलीही, ती एक जगण्याची प्रेरणा असते. भूक शमविण्यासाठी माणूस जंग जंग पछाडतो, पण याचक न बनता, कुणापुढे हात न पसरता जो जीवनात यश मिळवितो तोच प्रगतीची शिखरे पादाक्रांत करतो आणि तोच खरा भुकेचा सोहळा साजरा करू शकतो. जगण्याचं हे सार नवोदित गझलकार संदीप कळंबे आपल्या गझलेतील मतल्यात सांगतो,

कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी
भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला…

‘भुकेचा सोहळा’ हेच शीर्षक असलेला संदीप कळंबे यांचा पहिलावहिला कवितासंग्रह अष्टगंध प्रकाशनच्या संजय शिंदे यांनी नुकताच प्रकाशित केला असून हा संग्रह नक्कीच गझलप्रेमींची उत्तम काव्याची भूक भागविणारा आहे. संग्रहातील उत्तमोत्तम खयालात असलेले आणि मनोविश्लेष्णात्मक पातळीवरील शेर वाचल्यावर याची प्रचीती येते. नवीन पिढीतील हा आश्वासक गझलकार आपले मनोगत मांडताना म्हणतो,

अजून बोललो कुठे, ‘हवे तसे मला’
अजून शब्द भेटले न छानसे मला
पुन्हा पुन्हा प्रयास मी सुरूच ठेवला
पुन्हा पुन्हा प्रयास हा जरी हसे मला…

इतक्या परखडपणे स्वतःचे आत्मपरीक्षण करणारा हा गझलकार जे जगत आला तेच गझल, कवितेत उतरवीत आला. म्हणूनच त्याची गझलीयत वाचकाच्या मनाचा ठाव घेत असावी. कारण हे अनुभव, बोल, शब्द थोडय़ाफार फरकाने प्रत्येकाच्या जगण्यातील आहेत. यातील प्रत्येक शेर वाचकास आपलेसे करतो.
हा गझलकार प्रेमाची नवीन परिभाषा रुजवू पाहतोय. अनेक नावाजलेल्या कवी, शाहिरांनी प्रेमवीराला प्रेमरोगी म्हटले, पण कळंबे एका शेरात म्हणतो,

प्रेम म्हणजे रोग नाही लोकहो
मी कसा होईल बरा मला सांगू नका

मी सच्चा प्रेमी आहे. मला कोणत्याही विकाराचा स्पर्श झालेला नाही आणि माझं प्रेम पवित्र आहे. प्रेमात माझं काय होईल ते मी बघून घेईन. तुम्ही मात्र त्यावर उपाय-उपचार शोधत बसू नका. कारण मला जडलेला तो असाध्य आजार किंवा रोग नाही असं सांगून आजची तरुणाई प्रेमात परिपक्वतेची भाषा बोलू लागलीय हे अधोरेखित करणारा हा गझलकार प्रेमाला अधिक समंजस, परिपक्व करू पाहतोय, प्रेमाची परिभाषा बदलू पाहतोय, परंतु प्रेम आणि वात्सल्य यातील तफावतदेखील जाणून असणारा गझलकार सहज एका शेरात सांगून जातो,

बायको नुसतेच जेवण वाढते
आणि आई काळजी वाढायची…

जगण्यात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप वाढला, संपका&ची व्याप्ती वाढत गेली आणि माणूस व्यस्त होत गेलाय, परंतु परस्परांपासून दुरावत चालला आहे. क्षणोक्षणी हवेतल्या गप्पात एकमेकांची वास्तपुस्त होतेय खरी. मात्र अचानक संपका&ची साधनं कुचकामी ठरून वेळेला कोणीच उपयोगी येत नाही. त्यासाठी साधनं अपडेट ठेवण्याची कसरत करावीच लागते. तेव्हा कुठे माणसं रेंजमध्ये येतात. नव्या भाषेची गझल आत्मसात करणारा नव्या दमाचा गझलकार संदीप कळंबे लिहितो,

छान मिळते रेंज आताशी मला
मी मनाचा उंच टॉवर ठेवतो

या युवा गझलकाराचं सामाजिक, राजकीय व्यंग खुबीने मांडण्याचं कसब तर कमाल आहे. एका शेरात हा गझलकार म्हणतो,

दिसतात जे जसे जर नसतील वागताना
सरडय़ासमान माना त्या रंगधारकांना

आर्थिक आणि नैतिकतेवरही भाष्य करताना प्रगल्भतेने लिहिणारा हा गझलकार समकालीन गझल लिहिणाऱयांसाठी निश्चित आदर्श तसेच मार्गदर्शक ठरणार आहे.

संग्रहाला ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांची खुमासदार शैलीतील आशयघन प्रस्तावना लाभली आहे. त्यात उद्धृत केलेले शेर आणि त्याचे विश्लेषण म्हणजे मराठी साहित्य विश्वाला एक आश्वासक गझलकार मिळाल्याची जणू पावतीचं आहे. जीवनाची कर्मकहाणी अवघ्या पाच शेरात सांगण्याचं कसब वाखाणण्याजोगं आहे. संतोष घोंगडे यांनी रेखाटलेलं सूचक मुखपृष्ठ गझलाशय पूरक आहे. अष्टगंध प्रकाशनने आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अतिशय देखणा आणि उत्तम निर्मिती मूल्य जपणारा संग्रह वाचकांना नजर केला आहे. चोखंदळ वाचक आणि नवोदितांनी हा गझलसंग्रह नक्कीच संग्रही ठेवावा असा आहे.