ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दाभोळात रस्त्याची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक वारसा असलेल्या दाभोळ गावातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. उखडलेल्या रस्त्याचा अधिकचा त्रास हा स्थानिक रहीवाशांसह दाभोळ पंचक्रोशितील गावांमधील रहीवाशांना होत आहे. मात्र तरीसुध्दा सुस्त बांधकाम प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.

दापोली तालूक्यातील दाभोळ या गावाला ऐतिहासिकदृष्टया एक अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यामुळे दाभोळ गावात पर्यटक, इतिहासप्रेमी, अभ्यासक हे जसे शेकडोंच्या संख्येने येत असतात तसे दाभोळ ही एक दापोलीतील प्रमुख बाजार पेठ असल्याने दाभोळमध्ये विविध प्रकारचे सामान खरेदीसाठी आजूबाजूच्या गावातील ग्राहक येत असतात. अशा या दाभोळ गावातील अंतर्गत रस्ते तसेच दाभोळ गावातूनच जाणारा उसगाव, ओणनवसेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे. रस्ता पाहील्यावर आपल्या लक्षात येते की, रस्त्यातील खड्डे की खड्डयातील हा रस्ता आहे.

दाभोळ या गावाची लोकसंख्या 7028 एवढी आहे. या गावात विविध प्रकारची ऐतिहासिक स्थळे आहेत. ही ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी तषी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी उसळते. दाभोळ गावातून उसगाव या गावाकडे जाणारा रस्ता हा दाभोळ गावात ठिक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे वाहन चालकांना फारच धोक्याचे झालेले आहे.

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जूने आणि प्रसिध्द बंदर नव्हते. टाॅलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीनकाळी दाल्यभ्यपूरी होती, दालभ्यवती होती, महिकावती होती नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एकवेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण हिंदुस्थानातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदरात येत असत त्यामुळे दाभोळला बाहुलहिंद म्हणजेच मक्केचा दरवाजा असेही म्हणत. इतके दाभोळला पूर्वापार महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. तेराव्या शतकापर्यंत दाभोळचा इतिहास चैल, शिलाहार, आणि अशाच हिंदुराजवटीचा इतिहास आहे. अशा या पश्चिम किनारपट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहीती परदेशीयांना झाली आणि या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, र्तुक, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहीली हा दाभोळचा इतिहास आहे. अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या दाभोळातील सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरवस्था ही येथील विकासावर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक वारशाचे गाव म्हणून प्राधान्यक्रमांने रस्ते सुधारणांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम प्रशासनाने अधिक लक्ष देवून येथे येणा-यांसह स्थानिक रहीवाशांना रस्त्यातील खड्डे तुडवत अंतर काटावे लागू नये याची खबरदारी घ्यायला हवी.