
प्रदूषणामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात मृत होऊन कुजलेले मासे काढण्याची उपरती अखेर प्रशासनाला झाली आहे. कुजलेले मासे तसेच पाण्यात राहिल्याने सहन न होणारी दुर्गंधी तसेच जनावरांसह नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱया परिणामावरून दैनिक ‘सामना’मधून लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत मृत व कुजलेले 25 टक्के मासे काढले असून, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूरची वरदायिनी असलेली पंचगंगा नदी यापूर्वी जलपर्णीने व्यापून जात होती. मात्र, नदीचे प्रदूषण रोखण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कमी पडले. प्रदूषणमुक्तीचे आराखडे आणि कारवाईचे कागदी घोडे नाचवून केवळ फार्सच केल्याचे आजपर्यंत दिसून आले. परिणामी नदीत सलग तीन वर्षांपासून हजारो मृत मासे तरंगताना दिसत आहेत. यावेळीही सुर्वे बंधाऱयात गेल्या चार-पाच दिवसांपासून मृत माशांमुळे पुन्हा एकदा नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधले, तरीसुद्धा याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नसल्याचेही दिसून आले.
प्रदूषणामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून मृत झालेले हजारो मासे पाण्यात तरंगत असताना, प्रशासनाने स्वतः पुढे येऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांना यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करून त्यांना पंचनामा करण्यासह दूषित पाण्याचे नमुने घेण्यास भाग पाडण्यात आले. मृत व कुजलेल्या माशांचा खच तसाच पडून राहिल्याने प्रचंड दुर्गंधीने नदीकाठच्या जनावरांसह नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एकाही जनावराचा तसेच नागरिकाचा बळी गेल्यास त्याला सर्वस्वी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला होता.
याबाबत दैनिक ‘सामना’तून वृत्त प्रसिद्ध होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांना जाग आली असून, रविवारी मृत मासे बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, माशांची संख्या जास्त असल्याने केवळ 25 टक्केच मृत मासे पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
जबाबदारी निश्चित करणे गरजेचे – दिलीप देसाई
– रविवारी दुपारपासून नदीपात्रातील 25 टक्के मृत व कुजलेले मासे बाहेर काढले आहेत. त्याची शास्त्र्ााrय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अजूनही जादा कर्मचारी लावून उर्वरित मृत मासे काढून परिसर दुर्गंधीमुक्त करणे गरजेचे आहे. तसेच प्रदूषणासंदर्भात पुन्हा एकदा जबाबदारी निश्चित करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.



























































