
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या आणि खुनाच्या कट प्रकरणातील 10 संशयितांवर आज दोषनिश्चिती करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दहाही संशयितांना गुन्हा मान्य आहे काय? असा सवाल न्यायाधीशांनी केला असता, संशयितांनी ते अमान्य केले. आता या खटल्याची पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार असून, साक्षी-पुराव्यांना सुरुवात होणार आहे. विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.
आज सकाळी दोषनिश्चितीच्या कामकाजास सुरुवात होणार होती; पण काही संशयितांना घेऊन येणारे पोलीस दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यामुळे दुपारी 2.45पर्यंत कामकाज सुरू झाले. न्यायाधीशांनी संशयित प्रत्येकाला समोर बोलावून गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा केली, तेव्हा संशयितांनी ते अमान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपपत्रावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.
संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या विनंतीवरून वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी संशयितांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तावडे, समीर गायकवाड, अमोल काळे यांनी आरोपत्रावर सह्या केल्या.
‘एसआयटी’ने तपास करून 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यांतील दोघे फरार आहेत. 10 जणांवर दोषनिश्चिती केली आहे. कॉ. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने हा तपास ‘एटीएस’कडे देण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार तपास पुणे व कोल्हापूर एटीएसकडे दिला आहे. एटीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील हजर होते. यापुढे या खटल्याचे कामकाज कोल्हापुरातच चालणार आहे. भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. दिलीप पवार यांच्यासह कार्यकर्ते यावेळी हजर होते.
10 संशयित हजर
समीर विष्णू गायकवाड (वय 32, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय 48, रा. पनवेल, मुंबई), अमोल रवींद्र काळे (वय 34, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय 29, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (वय 37, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (वय 38, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (वय 25, रा. दौलताबाद, संभाजीनगर), सचिन प्रकाश आंदुरे (वय 32, रा. राजबाजार, संभाजीनगर), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हुबळी, धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (वय 30, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित आरोपी न्यायालयात हजर होते.

























































