झाडाला धडकून एलपीजी गॅसचा टँकर पेटला, चालकाला तरुणांनी वाचविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयगडहून गॅस भरून आलेल्या गॅस टँकरला कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली. एका वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून, स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून त्याला वाचविले. शाहूवाडी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

जयगडहून गॅस भरून हा टँकर येत असताना, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एका वळणावरील झाडाला टँकर धडकला. यात टँकरच्या केबीनला आग लागली होती. टँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली होती. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली.

दरम्यान, आगीत केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक तरुणांनी धाडसाने वाचवले. तसेच, 108 रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.